Skip directly to content

लेख : भाषा शिक्षण

प्रारंभीचे वाचन शिकवणे - महाराष्ट्रातील अनुभव

मॅक्सिन बर्नटसन (२००४) यांचे अप्रकाशित टिपण सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे, ‘क्वेस्ट करिता’ अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये प्रारंभीचे वाचन शिकवण्याच्या पद्धती हा दीर्घकाळ वादाचा मुद्दा राहिला आहे. अक्षर आणि त्याचा उच्चार याप्रमाणे प्रत्येक अक्षर वाचायला शिकवण्यावर भर असलेली, ‘फोनिक’पद्धत परंपरेने प्रचलित होती. १९३०च्या दशकात नवीन पद्धत स्वीकारली गेली. ही ‘साईट वर्ड’पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीत मुले, अंदाजे पन्नासएक शब्द ‘पाहून ओळखायला’ शिकतात. रुडोल्फ फ्लेश यांच्या ‘जॉनीला का वाचता येत नाही?’ या पुस्तकामुळे १९५५ मध्ये या पद्धतींवर पुष्कळ प्रयोग झाले आणि अटीतटीचे वाद होत राहिले आहेत. काही वादांना राजकीय रंगही होता. कॉन्झर्वेटिव्हज् पारंपरिक पद्धतींकडे वळा असे सांगत राहिले. तेव्हापासून मुळाक्षर पद्धतीवर भर देणार्‍या अनेक वाचन-पद्धती पुन्ही वापरल्या जाऊ लागल्या. नुकताच, काही मंडळींनी ‘संपूर्ण भाषा पद्धती’चा पुरस्कार केला आहे

वाचायला शिकण्याबाबतची टिप्पणी आणि छापील शब्दाला भिडणे - रोझेन कॉनी आणि हॅरॉल्ड

सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट करिता) प्रस्तुत उतारा ‘प्राथमिक शाळांमधील मुलांची भाषा’ या पेंग्विन बुक्सच्या पुस्तकातून घेतला आहे. १९७३ रोझेन कॉनी आणि हॅरॉल्ड यांनी हे पुस्तक लिहिले. साक्षर होणे : जोझ सगळ्यात नापास झाला. पाच वर्षे शासकीय शाळेत जाऊनही, ना त्याला वाचता येत होते, ना गणिते सोडवता येत होती. त्याला अगदी आरंभीच्या इतिहास भूगोलातल्या साध्या साध्या गोष्टीही येत नव्हत्या. त्याच्याबद्दल आम्हाला सांगताना असे वर्णन केले गेले – ‘शिकायची इच्छाच नाही, वाचन कौशल्ये नाहीत, वाचनात अडचणी आहेत.’

वाचनाचा श्रीगणेशा - पीटर वेस्टवुड

सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता) अर्थपूर्ण हेतूने वास्तव परिस्थितीत काम केले, की उपायात्मक शिकवणे-शिकणे खर्‍या अर्थाने घडते. आपण वाचायला शिकतो हे वाचत-वाचत, आणि लिहायला शिकतो ते लिहीत लिहीत. मात्र काम मुलांच्या आवाक्यातले हवे आणि कामाची प्रक्रिया मुलांना पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळायला हवी. मग यश हमखास मिळणारच. -प्रीन आणि बार्कर (१९८७) शिकणार्‍याच्या क्षमतांचा काळजीपूर्वक अंदाज घेतल्यावर, अभ्यासात, शिकण्यात मध्ये शिरून कशी मदत करायची याचा आराखडा बनविता येतो. वर्गात नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर वापरता येतील अशा अनेक कल्पना या लेखात दिल्या आहेत.

वाचनाचे टप्पे : एक आराखडा - जीन एस्. चॉल

सारांशात्मक मराठी रूपांतर - वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता) (‘वाचन-विकासाचे टप्पे’ (Stages of Reading Development), न्यूयार्क, मॅक ग्रॉहिल बुक कंपनी, १९८३ यामधील दुसर्‍या प्रकरणामधून. अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून ते परिपक्वतेच्या टप्प्यापर्यंत टप्पे प्रस्तुत आराखड्यात विचारात घेतले आहेत. त्यापैकी सहा टप्प्यांचे विवेचन येथे आहे. त्यात “खोटे-खोटे” वाचण्यापासून ते सर्जनशील परिपक्व वाचनापर्यंत विशिष्ट क्रमाने प्रगती होते. प्रत्येकाचा प्रगतीचा वेग भिन्न असला, तरी साधारणपणे याच क्रमाने टप्पे पार केले जातात. अगदी, विशेष गरज असलेले विद्यार्थीही याच टप्प्यांमधून जातात. व्यक्ती किंवा मूल आणि त्याच्या भोवतालच्या वातावरणातले घटक यांच्यामधील आंतरक्रियांवर प्रगतीचा वेग ठरतो.

साक्षरतेचा उगम :मुले वाचायला शिकतात.- जॉन मॅथ्यूज

सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (‘क्वेस्ट’करिता) मुले वेगवेगळ्या वस्तूंचे म्हणून वेगवेगळे आकार कागदावर काढतात. वस्तूंची हालचाल दाखवण्यासाठीही मुले आकार काढतात. हळूहळू मुलांना हेही समजते की आवाजांचेही आकार कागदावर काढता येतात, आपल्या आणि इतरांच्या बोलण्याचे आकार काढता येतात. उदाहरणार्थ, बेनने ट्रंपेट या वाद्यातून निघणार्‍या संगीताचे चित्र काढले होते. दुसरे उदाहरण हॅनाचे आहे. हॅना दोन वर्षे, दोन महिन्यांची होती. फेल्टपेन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे हलवत हलवत, कमानीसारख्या क्षितिजसमांतर रेषा काढता काढता ती तोंडाने ‘बा बा बा’ म्हणत होती. ‘बा’चा आवाज आणि एकेक रेष हे दोन्ही अगदी जोडीने येत होते. एकेक रेष एकेका ‘बा’साठी चित्रित झाली किंवा तिने ‘बा’ लिहिले असे म्हणता येईल का ?

मुलांना शाळेतले शिक्षण अवघड का जाते ? - -मार्गारेट डोनाल्डसन

मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्टकरिता) मार्गारेट डोनाल्डसन यांचे लेखन त्यांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. त्यांनी विचारपूर्वक आणि नेमकी वापरलेली भाषा समजून घेताना काही ठिकाणी वाचकालाही कष्ट पडतात; परंतु कष्टपूर्वक वाचून, जरूर तर पुन्हा वाचून, त्यांना काय म्हणायचे आहे हे समजून घेणे अतिशय आनंदाचे आहे. मराठीत रूपांतर करताना, त्यांच्या विचाराला, मांडणीला धक्का लागू नये अशी काळजी घेताना काही ठिकाणी मराठी वाक्येही काहीशी क्लिष्ट वाटतील. मात्र नेमका अर्थ पोहोचावा यासाठी त्याला पर्याय नव्हता ! मुलांच्या विचारप्रक्रियेचा विकास, भाषाविकासाचा त्याच्याशी असलेला संबंध आणि या दोन्हीचा शालेय शिक्षणाच्या स्वरूपाशी असलेला संबंध डोनाल्डसन यांनी विलक्षण बारकाईने प्रस्तुत लेखात उलगडून दाखवला आहे. (मार्गारेट डोनाल्डसन यांच्या ‘चिल्ड्रन्स माइंड्स’ या पुस्तकातून. प्रकाशन : लंडन फोंटाना प्रेस हार्पर कॉलिन्स)

क्रमिक पुस्तकाचे अध्यापन

८.१ प्रस्तावना : मूल भाषा कशी शिकते : श्रवण, संभाषण, वाचन, लेखन ही भाषेची मूलभूत कौशल्ये विकसित होणे का महत्त्वाचे आहे हे आपण आतापर्यंत पाहिले. या कौशल्याचा विकास होण्यासाठी पोषक असे उपक्रम व साधने यांचाही आपण अभ्यास केला. क्रमिक पुस्तक हे सर्वच शाळांमध्ये उपलब्ध असणारे एक महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचा प्रभावी वापर करून मुलांच्या भाषा विकासाचा मोठा हातभार लावता येतो. क्रमिक पुस्तकातील वेचे (पाठ), कविता अभ्यासणे, त्यांचा आनंद घेणे प्रक्रियेत अनेक भाषिक कौशल्यांचा वापर मुले करताता व या वापरामुळे त्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकासही घडतो. अर्थातच आपण क्रमिक पुस्तक कसे वापरतो यावर हा विकास घडणार की नाही हे अवलंबून आहे. या प्रकरणात आपण क्रमिक पुस्तकाचा प्रभावी वापर कसा होऊ शकतो हे काही नमुन्यांच्या उदाहणाआधारे अभ्यासणार आहोत.

साक्षर होणे आणि डॉनी (भाग १) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स

प्रस्तावना मूळ लेखामधील नावे आपल्याला वाचताना काहीशी अपरिचित वाटतील, तरीही ती तशीच ठेवली आहेत. वाचन-लेखन शिकताना अडचण येणारी मुले जगात सगळीकडे आढळतात. ज्यांच्या घरची मोठी माणसे साक्षर नाहीत अशी कितीतरी मुले आपल्या देशात आहेत. डॉनीच्या घरची मोठी माणेसही साक्षर नव्हती. अशा मुलांकडे बघण्याची आपली दृष्टी, त्यांना मदत करण्याचे मार्ग यांबद्दल या लेखातून महत्त्वाचे काही आपल्या हाती लागते. शालेय व्यवस्थेची चौकट अशा मुलांच्या संदर्भात कशी अपुरी पडते याचे या लेखात आलेले उल्लेख बोधक आहेत. लिहिता-वाचता न येणार्‍या मुलांना स्वतःबद्दल काय वाटते, त्यांची आत्मप्रतिमा कशी घडत जाते यांचेही संदर्भ या लेखात येतात. लिखित शब्द, अक्षरे, उच्चार, वाचन शिकण्याची प्रक्रिया यांविषयीचे लेखात टिपलेले बारकावे समजून घेण्यासारखे आहेत. वाचनाची अडचण असणार्‍या मुलांकडे बघण्याची आपली दृष्टी त्यातून आमूलाग्र बदलून जाईल.

भाषा आणि कला - जेन साही

श्रीमती जेन साही यांच्या ‘शिक्षणातील कलेचे स्थान’ या अप्रकाशित पुस्तकातून ‘भाषा आणि कला’ हा प्रस्तुत उतारा घेतला आहे. मुले जेव्हा आपला अनुभव प्रतीकांच्या माध्यमातून मांडायला शिकतात, आपले विचार आणि कल्पना इतरांपाशी व्यक्त करू लागतात तेव्हा त्या प्रक्रियेत ती भाषा, अनुकरण आणि सर्जनशीलता या तीन गोष्टी माध्यम म्हणून वापरत असतात. भाषा म्हणजे फक्त बोललेले शब्द नव्हेत, तर दृक्-भाषासुद्धा. प्रतिमांची दृक्-भाषा आणि शब्द एकमेकांशी जवळून जोडलेले असतात. ते दोन्ही एकत्र प्रकट होतात, ते नाटक बाहुलीनाट्य, गोष्ट सांगणे अशा प्रसंगी.

साक्षर होणे आणि डॉनी (भाग 2) - व्हिक्टोरिया पर्सल गेट्स

डॉनीला कागद, पेन आणि इतर लेखन साहित्य सहज उपलब्ध होते. शिवाय अवतीभवती अनेकजण लिहीत असताना तो पाहात होता. या सगळ्यात त्याला रस वाटायला लागला आणि कागद-पेन घेऊन त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करायला त्याने सुरुवात केली. त्याने वेगेवेगळे भौमितिक आकार काढले...सुटी सुटी अक्षरे लिहिली...वेगवेगळ्या रंगांत आणि आकारांत आपले नाव लिहिले. इतर मुले आपली स्वतःची पुस्तके बनवतात हे पाहिल्यावर त्यानेही स्वतःचे पुस्तक तयार करायचे ठरवले. ‘लिपी’च्या संकल्पनेचा शिरकाव डॉनीच्या मनात झाला तो अशा रीतीने.

Pages