Skip directly to content

साक्षरतेचा उगम :मुले वाचायला शिकतात.- जॉन मॅथ्यूज

सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (‘क्वेस्ट’करिता)

मुले वेगवेगळ्या वस्तूंचे म्हणून वेगवेगळे आकार कागदावर काढतात. वस्तूंची हालचाल दाखवण्यासाठीही मुले आकार काढतात. हळूहळू मुलांना हेही समजते की आवाजांचेही आकार कागदावर काढता येतात, आपल्या आणि इतरांच्या बोलण्याचे आकार काढता येतात. उदाहरणार्थ, बेनने ट्रंपेट या वाद्यातून निघणार्‍या संगीताचे चित्र काढले होते. दुसरे उदाहरण हॅनाचे आहे. हॅना दोन वर्षे, दोन महिन्यांची होती. फेल्टपेन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे हलवत हलवत, कमानीसारख्या क्षितिजसमांतर रेषा काढता काढता ती तोंडाने ‘बा बा बा’ म्हणत होती. ‘बा’चा आवाज आणि एकेक रेष हे दोन्ही अगदी जोडीने येत होते. एकेक रेष एकेका ‘बा’साठी चित्रित झाली किंवा तिने ‘बा’ लिहिले असे म्हणता येईल का ?

मग हॅना मलाही खेळायला बोलावते आणि मी ‘बा बा बा’ म्हणतो. प्रत्येक ‘बा’ सरशी, नेमक्या तेवढ्यातच वेळात हॅना पेनाने रेषा काढते.

मुलांची चित्रे, त्यातल्या प्रतिमा विशिष्ट प्रकारे समजून घ्याव्या लागतात.

चित्रांमधून किंवा प्रतिमांमधून काही समजून घेण्यासाठी आपल्या मेंदूला करावे लागणारे काम आणि शब्दांमधून, अक्षरांमधून काही समजून घेण्यासाठी आपल्या मेंदूला करावे लागणारे काम यात फरक आहे. घोड्याचे चित्र आणि ‘घोडा’ हा शब्द हे याच प्रकारे वेगळे ठरतात. यातला फरक समजून घेण्याचे काम, वाचायला शिकताना मूल पहिल्यांदाच करीत असते. जगातल्या सर्व वस्तू, घटना यांना कागदावरच्या द्विमित आकारांमध्ये कसे बांधता येते याचा शोध मूल घेत असते.

बेनसाठी बी हे अक्षर दाखवणारा आकार महत्त्वाचा आहे, कारण ते त्याच्या नावातले पहिले अक्षर आहे ! ते अक्षर त्याच्या खेळाच्या विश्वाचा भाग बनून गेले आहे.

मुलांना अक्षरे आणि चित्रे यातील फरक आपोआप समजतो असे मानणे रांगडेपणाचे ठरेल.

आकृती क्र. ८२ मध्ये काढलेल्या मनुष्याकृतीचे हात आणि ‘खाली’ या अर्थाची चिनी भाषेतली खूण, हे दोन्ही पाहिले तर त्यातले साधर्म्य आपल्या सहज लक्षात येईल.

आकृती क्र. ८३ मध्ये असलेला चौकोन म्हणजे अंतराळयान आहे आणि त्यात तीन अंतराळवीर आहेत. त्यापैकी ‘बी’ या अक्षराने ‘बेन’ हा अंतराळवीर दाखवला आहे. बेनने स्वतःच हे चित्र काढले आहे. कॅपिटल बी आणि चित्रातील इतर आकार यांना चित्रात तेवढ्याच तोलामोलाचे स्थान आहे.

मानवी इतिहास असो वा मानवी बाळाची वाढ असो, प्रतिमा आणि शब्द यांच्या विकासाचा एकमेकांशी दृढ संबंध असलेला दिसतो.

मुले जेव्हा वाचायला आणि लिहायला शिकतात, तेव्हा त्यांच्या स्वतःच्या नावातली अक्षरे त्यांच्यासाठी अर्थपूर्ण बनून जातात ! ती अक्षरे मुलांचे प्रतिनिधित्व करतात आणि वेळोवेळी चित्रांमध्ये उमटतात ! 

बेनने काढलेल्या एका चित्रात एका बंदिस्त आकारात बी ई एन ही अक्षरे आहेत – म्हणजे बेन घरात आहे. आणि त्या घरावरून सँटाक्लॉज आणि त्याचे रेनडिअर उडत चालले आहे.

अगदी प्रारंभीच्या काळात, नक्की पुढे कसे लिहायचे याचे पक्के नियोजन मनाशी झालेले नसल्यामुळे म्हणा, किंवा अन्य कारणाने म्हणा, कितीतरी मुले अक्षरांच्या उलट्या प्रतिमा काढतात. या प्रतिमा कधी आरशातल्या प्रतिबिंबासारख्या असतात, तर कधी पाण्यातल्या प्रतिबिंबासारख्या. मेंदूच्या डाव्या-उजव्या भागाशी याचा संबंध असावा. मी मांडारिन लिपीतील आकार काढताना हे घडलेले मला आठवते. काही चिनी अक्षरे मी कधी कधी बरोब्बर उलटी लिहीत असे. बर्‍याच वर्षांनंतर आता असे घडत नाही. किंबहुना उलटे लिहायला सांगितले, तर ते जड जाते !

प्रतिके आणि अर्थ यांची मुक्तपणे आणि लवचिकपणे जोडणी मुले बालवयात करीत असतात. बेनने काढलेल्या एका चित्रात झेंडे धरलेली सहा मुले आहेत. प्रत्येक मूल इंग्रजी सहाच्या आकाराचे आहे ! विचार कसा करता येतो, याबाबतच्याच विचारची बीजे यातून दिसतात म्हणून या प्रकारची मांडणी महत्त्वाची ठरते. ‘सहा’ची आकृती म्हणजेच सहांपैकी एकेकजण या प्रकारच्या विविधतापूर्ण आणि सखोल असा सहबांधांना सहज स्वीकारणारे, त्यांना खतपाणी घालणारे वातावरण बालशाळांमध्ये असायला हवे.

बर्‍याच मुलांना अक्षरे लिहायला शिकण्यात रस असतो, त्याच्या बरोबरीनेच लिहिण्याशी खेळता खेळता ती ओळीने, लिहिण्याच्या लयीत आकार काढतात. चार वर्षे दहा महिन्यांच्या हॅनाने कमानींसारखे एकमेकांना जोडून काढलेले आकार हे याचेच उदाहरण. चित्र आणि लिहिण्याची नक्कल यात तेव्हा स्पष्ट फरक दिसतो. या टप्प्यावर असताना, मुलांची चित्रे आणि ‘लेखनातली प्रतिके’ एकमेकांत मिसळून कागदावर उमटतात.

अक्षरे, आकडे आणि चित्रे वेगवेगळी असतात याची मुलांना जाणीव झाली, तरी ती नक्की कसे काम करतात हे समजण्यासाठी हे सगळे आकार मुलांच्या खेळाचा भाग बनून जायला हवेत. त्यांची मोड-जोड करता करता, त्याच्यात अर्थ लपलेला असतो हे हळू हळू मुलांना उमगत जाते. त्यांच्या दृष्टीने विशेष अर्थपूर्ण असलेल्या खुणा (आई, बाबा, स्वतःचे नाव) त्यांच्या स्वतःच्या ‘प्रतीक-व्यवस्थे’चा भाग बनून जातात. अशा रीतीने मुलाची चित्रे आणि आरंभीचे लेखन म्हणजे अगदी व्यक्तिगत आणि अनन्यसाधारण अशी दृक-भाषा असते. प्रतिमांची जोडणी प्रत्येकाकडून अनन्यसाधारण प्रकारे केली जाते. म्हणून आकारांशी, अक्षरांशी मुलांना मुक्तपणे रंग, रेषा, आकार यांच्यातील नात्याचा शोध मुले घेत असतात. खर्‍या जगातील वस्तू, घटना यांची रंग, रेषा, आकार यांच्या द्वारा प्रातिनिधिक, प्रतिकात्मक मांडणी करता येते हे त्यांना उमगते. या टप्प्यावर आरंभीच्या लेखनात या सगळ्याचे प्रतिबिंब उमटते. प्रतिकांच्या या मांडणीला विशिष्ट, वेगवेगळा अर्थ असतो हेही शिकण्याची सुरुवात याच टप्प्यावर होते.