Skip directly to content

समजून उमजून 'अध्ययन सिद्धांत' कार्यशाळा, एप्रिल २०-२३, २०१७

चार दिवसांची ‘अध्ययन सिद्धांत कार्यशाळा’ सोनाळे इथे एप्रिल २० ते २३ दरम्यान पार पडली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ४० सहभागींनी ‘लर्निंग थियरीज’ बद्दल भरपूर माहिती मिळवली. डी एड / बी एड किंवा सायाकॉलॉजी शिकलेल्या लोकांना ज्या आंतरराष्ट्रीय विचारवंतांची निव्वळ तोंडओळख झालेली असते त्या स्किनर, पियाजे, वायगॉट्स्की, चॉम्स्की अशा धुरीणांच्या थियरीज या कार्यशाळेत खूप विस्ताराने आणि खोलवर अभ्यासल्या गेल्या. नीलेश निमकर आणि किशोर दरक हे प्रमुख साधन व्यक्ती असलेली ही कार्यशाळा म्हणजे ‘बौद्धिक मेजवानी’ होती असं एक सहभागी म्हणाले!

क्वेस्ट तर्फे प्रथमच अशी कार्यशाळा घेण्यात आली. लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक होता – सुरुवातीला केवळ २५ जागा होत्या, ज्या कार्यशाळा जाहीर झाल्यावर २ दिवसांत भरल्या! मग खास लोकाग्रहास्तव हा आकडा वाढवून शेवटी ४० पर्यंत गेला! या अनुभवाने क्वेस्ट टीमही समृद्ध झाली आहे.  

एक सहभागी, रुपेश पाटील यांनी आपली प्रतिक्रिया लिहून कळवली, ती अशी :

“दि. २० एप्रिल ते २३ एप्रिल २०१७ क्वेस्ट(QUEST) सोनाळे ता. वाडा, जि. पालघर या संस्थेमार्फत अध्ययन सिद्धांत (learning theories) या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात या विषयावर कुणी कार्यशाळा घेत असेल किंवा घेतली असेल अशी शक्यता फार कमी वाटते. मुळात आपल्याकडे शिक्षण हा विषय तसा दुय्यम वा दुर्लक्षित करण्यायोग्य मानला जातो असे मानण्याजोगी परिस्थिती आहे.

माणसाचे मूल कसे शिकते या गोष्टीचा विचार करणारी,त्याचा अभ्यास करणारी व तो अभ्यास नेमकेपणाने मांडू शकणारी फारच कमी माणसे आपल्या समाजात आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून अशी शिक्षणासंबधी मूलभूत विचार करणारी मंडळी समोर आली.

मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे शिकणे. किंबहुना शिक्षण हेच जीवन व जीवन हेच शिक्षण असे म्हटले जाते. परंतु त्या शिक्षणाचा शास्त्रशुद्ध विचार केला जात नाही हे आपल्या समाजाचे सर्वात मोठे दुखणे आहे. या कार्यशाळेत त्या दुखण्यावर बऱ्यापैकी विचार व उपाय केला गेला. 

शिक्षणाचा समग्र विचार म्हणजे काय?अभिजनांबरोबरच वंचित,बहिष्कृत व बहुजनांच्या शिक्षणातील अडचणींचा, त्यावरील उपायांचा विचार करायला लावणारी ही कार्यशाळा होती. 

प्रमुख साधनव्यक्ती म्हणून शिक्षणतज्ञ-भाषातज्ञ व क्वेस्टचे संचालक श्री. नीलेश निमकर, शिक्षणतज्ञ,समाजशास्त्रज्ञ, गणितज्ञ श्री. किशोर दरक तसेच यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत असलेले आमचे शिक्षकमित्र प्रल्हाद काठोले तसेच क्वेस्टचे इतर सहकारी यांनी प्रचंड अभ्यासाने, मेहनतीने व सहानुभूतीने ही कार्यशाळा यशस्वी केली.

या कार्यशाळेसाठी प्रशिक्षणार्थी म्हणुन जवळपास ४० शिक्षक, शिक्षण प्रशासनातील अधिकारी, शिक्षक प्रशिक्षक,स्वयंसेवक, पालक सहभागी झाले होते. 

एक शिक्षक, पालक, बहुजन-पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता व एक आशावादी मनुष्य म्हणून ही कार्यशाळा महाराष्ट्रातील प्राथमिक (किंवा एकूणच) शिक्षणक्षेत्राला दिशा देणारी होती असे मी म्हणू शकतो.” रुपेश नागेश पाटील, सहभागी प्रशिक्षणार्थी, वाडा, जि. पालघर