Skip directly to content

वाचनाचा श्रीगणेशा - पीटर वेस्टवुड

सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्ट’करिता)

अर्थपूर्ण हेतूने वास्तव परिस्थितीत काम केले, की उपायात्मक शिकवणे-शिकणे खर्‍या अर्थाने घडते. आपण वाचायला शिकतो हे वाचत-वाचत, आणि लिहायला शिकतो ते लिहीत लिहीत. मात्र काम मुलांच्या आवाक्यातले हवे आणि कामाची प्रक्रिया मुलांना पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळायला हवी. मग यश हमखास मिळणारच.

-प्रीन आणि बार्कर (१९८७)

शिकणार्‍याच्या क्षमतांचा काळजीपूर्वक अंदाज घेतल्यावर, अभ्यासात, शिकण्यात मध्ये शिरून कशी मदत करायची याचा आराखडा बनविता येतो. वर्गात नेहमीच्या अभ्यासक्रमाबरोबर वापरता येतील अशा अनेक कल्पना या लेखात दिल्या आहेत.

वाचन-पूर्व टप्पा आणि वाचन-आरंभाचा टप्पा या काळातील वाचनानुभव :

 

अत्यंत दक्षतापूर्वक रचलेल्या अभ्यासक्रमाची वाचनपूर्व टप्प्यातील बहुसंख्य मुलांसाठी गरज नसते. शालेय जीवनातल्या सर्वसाधारण अपेक्षांशी मुलाचे जुळले, की वाचन-पाठांची सुरुवात व्हायला हवी. बौद्धिकदृष्ट्या विशेष गरज असलेल्या, दृक संवेदनाची अडचण असलेल्या मुलांना मात्र रचलेल्या अभ्यासक्रमाची गरज असते. मुलांना बोलण्याची आणि ऐकण्याची मुबलक संधी वर्गात मिळायला हवी. वाचन-शिक्षणाचा पाया त्यातून घातला जातो.

शब्दांच्या जोड्या, शब्द-चित्रे यांच्या जोड्या, अक्षरे, शब्द पाहून लिहिणे अशा कृती करताना मुलांची पुढच्या टप्प्याची तयारी होत असते.

आकारांकडे नुसत्या ‘बघण्या’कडून ‘साम्यभेद ओळखण्या’कडे

 

मूल व्यवस्थित बोलणारे असेल, आणि कागदावरच्या खाणाखुणा म्हणजे शब्द असतात हे त्याला उमगले असेल, तर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे आकार ओळखण्याची सर्वोच्च पातळी-आकारांमधील, अक्षरांच्या आकारांमधील बारीक सारीक भेद आणि साम्ये ओळखणे; अक्षरांच्या क्रमामधील भेद आणि साम्ये ओळखणे.

एखादे मूल या प्रकारे अक्षरांमधील साम्य-भेद ओळखू शकत नसेल, तर पुठ्ठ्याचे विविध आकार बनवून, दोन सारखे आकार त्याने ओळखण्यापासून सुरुवात करावी लागेल, डोळे झाकून हाताने चाचपून सारखे आकार शोधण्याचाही अशा मुलांना फायदा होतो. पुढे अक्षरांचेच असे कापलेले आकार देऊन त्यातून दोन सारखे आकार मुलांना शोधायला देता येतात. मुले हे आवडीने करताता. त्यांचा त्यात सक्रिय सहभाग असतो, हेही महत्त्वाचे.

दृष्टिदोष किंवा दृक-संवेदन दोष असणार्‍या मुलांना खोदपाटीतील अक्षरांमधून बोट फिरविणे, अरेध काढलेले अक्षर पूर्ण काढणे, ठिपक्यांनी लिहिलेल्या अक्षरावरून पेन्सिलीने लिहिणे अशा कृतींचा फायदा होतो.

वाचनपूर्वतयारीच्या टप्प्यावरच्या कृती साधारणपणे या प्रकारे कठीण होत जायला हव्यात :

-चित्र-जोड्या

-आकार-जोड्या

-अक्षराशी साम्य असलेल्या आकारांच्या जोड्या

-शब्दजोड्या

चित्राशी शब्दाच्या जोड्या जुळवण्याचाही शब्द परिचयाच्या टप्प्यावर उपयोग होतो. मोठ्या किंवा छोट्या चित्रांचा यासाठी वापर करता येतो. चित्रात जे जे दिसते ते शब्द छोट्या छोट्या पट्ट्यांवर लिहून घ्यावे. ते मुलांना त्या त्या चित्रावर ठेवायला सांगावेत. ही कृती मुले गटागटानेही करू शकतात.

दृक-स्मरण आणि दृक-क्रमस्मरण :

 

डोळ्याने पाहून क्रमवार मांडलेल्या साहित्याचा क्रम लक्षात ठेवणे आणि मग ते साहित्य तशाच क्रमाने मांडणे या कृतीचा वाचनासाठी उपयोग होतो. वाचताना वाक्यातले आधीचे शब्द लक्षात ठेवून पुढे जावे लागते. त्याची तयारी यातून होते.

वाक्यांमधील शब्द पत्त्यांवर लिहून त्यांची वाक्य बनवायला मुलांना प्रोत्साहन द्यायल हवे. उदाहरणार्थ –

बाबा  काल  आले.

मामा  आज  आले.

शब्दपत्त्यांमधून वाक्ये बनवणे हे वाचन-लेखन दोन्ही क्षमतांच्या विकासासाठी महत्त्वाचे.

हस्तनेत्रसमन्वय आणि कारक विकास :

 

विविध रचना करणे, चिकटकाम, ओवणी, कातरकाम, चित्र गिरवणे, चित्रकोडे सोडवणे या कृतींमधून मुलांच्या छोट्या स्नायूंचा विकास होतो. मोठ्या फळ्यावर संपूर्ण हात हलवून खडूने रेघोट्या मारण्याचाही मुलांच्या कारकविकासासाठी फायदा होतो. ठिपके जोडणे, ‘रस्ता शोधा’सारखी कोडी सोडवणे यातूनही कारकविकासाला मदत होते. ज्या मुलांना अडचण आहे, अशांना अचूक वळण शिकवणे महत्त्वाचे ठरते. मज्जासंस्थेचे विकार असणार्‍या मुलांना हे शिकवणे विशेष महत्त्वाचे.

काही मुले अक्षरे उलटी, प्रतिबिंबासारखी लिहितात. मेंदूचा कोणता अर्धा भाग अधिक प्रभावी हे नेमकेपणाने ठरले नसल्यामुळे असे होण्याची शक्यता असते. सहाव्या वर्षापर्यंत असे घडत असल्यास काळजीचे कारण नाही. मात्र त्यानंतर त्याचे प्रमाण कमी झाले नाही तर अशा मुलांकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

श्रवणाचे शिक्षण :

 

संभाषणाच्या कौशल्यांइतकीच आणि दृक कौशल्यांइतकीच श्रवणाची कौशल्येही वाचन शिकताना महत्त्वाची असतात. अचूक लेखनासाठीही, आवाजांचे विश्लेषण करण्याची जाणीव तीव्र असावी लागते.

वाचन शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावरच मुलाला श्रवणाचेही भरपूर अनुभव मिळायला हवेत. ऐकलेल्या आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता त्यातून विकसित होते. उदाहरणार्थ – चाक-चाके, पाट-पाठ, काठ-खाठ, वास-पास यातील नेमका फरक ऐकण्याची क्षमता.

शब्दांच्या उच्चारांवरून त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमताही वाचन शिकताना महत्त्वाची ठरते. ज्यांचा शेवट सारखा ऐकू येतो. असे शब्द मुलांना शोधायला सांगावे. उदा- पाणी-गाणी-राणी-नाणी;  किंवा पान-मान-छान-लहान-कान.

एखादा शब्द कोणकोणत्या आवाजांनी बनला आहे याकडे बघण्याची दृष्टीही मुलांमध्ये अवश्य विकसित करायला हवी, त्यांच्या क्रमाकडेही मुलांचे लक्ष वेधायला हवे.

एका वाक्यात किती शब्द ऐकू आले, शब्दात किती आवाज ऐकू आली हे शोधण्याच्या खेळाचाही आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्यासाठी उपयोग होतो.

एका वाक्यात किती शब्द ऐकू आले, शब्दात किती आवाज ऐकू आली हे शोधण्याच्या खेळाचाही आवाजांमधला सूक्ष्म फरक ओळखण्यासाठी उपयोग होतो.

यमक जुळणारी वाक्ये असणार्‍या गोष्टी मुलांना ऐकायला मिळायला हव्यात. उदाहरणार्थ – एक होता मासा. त्याला दिसला ससा. तो सशाला म्हणाला, “तू आज इकडे कसा?”

गटात सर्वांनी मिळून पुस्तकातली गोष्ट ऐकणे :

 

काही देशांमध्ये वर्गात वापरण्यासाठी खूप मोठ्या आकाराची पुस्तके मिळतात. २०-२५ मुलांच्या गटासमोर असे पुस्तक धरून, पाने उलटत, शिक्षकाने गोष्टी वाचन दाखवल्या, तर बहुसंख्य मुलांना वाचनाची गोडी लागते असे दिसून आले आहे.

मुलांच्या भाषेचा वाचन शिकवण्यासाठी उपयोग:

 

या पद्धतीत, मुलांच्या भाषेचाच वापर करून मोठ्या प्रमाणावर वाचन-साहित्य बनवले जाते. मुलाने कथन करायचे व ते शिक्षकाने लिहून काढायचे. मुलाला ज्यात रस वाटतो, तोच आशय वाचनसाहित्यात आल्यामुळे वाचनात मुलांना गोडी वाटते.

मुलांनी काढलेल्या चित्रांविषयी ती जे सांगतील ते त्याखाली लिहिण्या5तूनही वाचनाचा पाया घालण्याची सुरुवात होऊ शकते. आपण जे बोलतो, ते लिहिता येते याची जाणीव त्यातून विकसित होते. 

छोटेसे पुस्तक बनवण्यासाठीही याच पद्धतीचा वापर करावा. एकेका पानावर चित्र चिकटवून मुलाने सांगितलेले त्याबद्दलचे वाक्य त्याखाली शिक्षकाने लिहून काढावे. वाटल्यास मुलाने तेच वाक्य पाहून शेजारी वा खाली पुन्हा लिहावे.

चित्रांचा वापर :

 

बरेच तपशील असणार्‍या, एखाद्या विषयावरील चित्राचा उपयोग वाचन शिकवण्याच्या प्राथमिक टप्प्यावर केला, तर मुलांना शब्द ओळखता येऊ लागतात. त्या चित्रात मुलाला दिसणारे तपशील एकेका कार्डावर एकेक शब्द याप्रमाणे लिहावे. ती कार्डे पुन्हा पुन्हा दाखवून त्यांची उजळणी केली, की मुले ते शब्द ओळखू लागतात. वाचनाविषयी किमान गोडी यातून लागू शकते.

वरील सर्व पद्धती व उपक्रम संपूर्ण वर्गासाठी तर उपयोगी ठरतातच, शिवाय सावकाश शिकणार्‍या वा विशेष गरज असणार्‍या मुलांसाठीही त्या प्रभावी ठरतात.