Skip directly to content

मुलांना शाळेतले शिक्षण अवघड का जाते ? - -मार्गारेट डोनाल्डसन

मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे (क्वेस्टकरिता)

मार्गारेट डोनाल्डसन यांचे लेखन त्यांच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. त्यांनी विचारपूर्वक आणि नेमकी वापरलेली भाषा समजून घेताना काही ठिकाणी वाचकालाही कष्ट पडतात; परंतु कष्टपूर्वक वाचून, जरूर तर पुन्हा वाचून, त्यांना काय म्हणायचे आहे हे समजून घेणे अतिशय आनंदाचे आहे.

मराठीत रूपांतर करताना, त्यांच्या विचाराला, मांडणीला धक्का लागू नये अशी काळजी घेताना काही ठिकाणी मराठी वाक्येही काहीशी क्लिष्ट वाटतील. मात्र नेमका अर्थ पोहोचावा यासाठी त्याला पर्याय नव्हता !

मुलांच्या विचारप्रक्रियेचा विकास, भाषाविकासाचा त्याच्याशी असलेला संबंध आणि या दोन्हीचा शालेय शिक्षणाच्या स्वरूपाशी असलेला संबंध डोनाल्डसन यांनी विलक्षण बारकाईने प्रस्तुत लेखात उलगडून दाखवला आहे.

(मार्गारेट डोनाल्डसन यांच्या ‘चिल्ड्रन्स माइंड्स’ या पुस्तकातून. प्रकाशन : लंडन फोंटाना प्रेस हार्पर कॉलिन्स)

[प्रत्यक्ष परिस्थितीजन्य अनुभव घेत घेत लहान मूल त्यांचा अर्थ लावत असते. उत्स्फूर्तपणे आणि नैसर्गिकपणे ते भाषा वापरत असते. शाळेत मात्र अशी अपेक्षा असते, की भाषेकडे मुलाने थोड्या त्रयस्थपणे आणि सजगपणे पहावे, प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याने आता क्षणभर थांबून, वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिसाद द्यावे. साधार निष्कर्ष काढण्याची क्षमता वापरणे म्हणजेच गृहीतके बांधणे आणि त्यावरून अनुमान करणे हे भाषिक आकलनात आणि विकासात कळीची भूमिका करते.

विचार करणे, प्रश्नांचे आणि प्रतिसादांचे विश्लेषण करणे, विशिष्ट संदर्भापासून सुटी करून भाषेला अमूर्त रूपात पाहणे ही लिखित भाषेची खास वैशिष्ट्ये आहेत. मात्र, बोलल्या जाणार्‍या भाषेची ही वैशिष्ट्ये नाहीत. डोनाल्डसन म्हणतात की ज्या मुलांना अशा अमूर्त प्रकारे भाषेचा वापर करण्याची सवय असते, त्यांना पुस्तकांपर्यंतची वाट चालून जाणे सोपे जाते; त्यांना ‘लेखनाच्या मागण्या’, ‘लेखनाची शिस्त’ यांच्याशी जुळवून घेणेही सोपे जाते.

भाषिक सजगता आणि विचारपद्धतींविषयीची सजगता यांच्यातल्या बळकट दुव्याविषयी डोनाल्डसन बोलतात. त्या म्हणतात, सजगता आणि पकड यांचा जवळचा संबंध असतो. त्यामुळे भाषेच्या स्वरूपाविषयी मूल जसजसे सजग होत जाते, तसतशी त्याची भाषेवरची पकड अधिकाधिक दृढ होत जाते.]

...आधीच्या प्रकरणातील चर्चेत आपण पाहिले, की लहान मुलाची (young human being) प्रतिमा कशी असते. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये अशी :

 १. जीवनाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासूनच ते भोवतालच्या जगाचा अर्थ लावण्याचा सक्रिय प्रयत्न करत असते : ते प्रश्न विचारते, त्याला काही ना काही जाणून घ्यायचे असते. भाषेद्वारा प्रश्न विचारता यायला लागण्याच्या आधीपासूनच हे खरे असते. खूप लहान वयातच मूल सहेतुक कृती करू लागते. त्याला स्वतःच्या इच्छेने काही ना काही करायचे असते. ‘गोष्टी कशा आहेत’ याबाबतच्या आकलनाची सीमा ओलांडून, ते, ‘गोष्टी कशा असू शकतात’ या आकलनापर्यंतचा प्रवास करते.

२. जाणून घेण्याच्या इच्छेच्या जोडीनेच ‘शक्यता’ या गोष्टीची जाणीव जन्माला येते. प्रथम अज्ञानाची जाणीव होते. अज्ञाताच्या कक्षा कमी करून ज्ञाताच्या कक्षांचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अनिश्चितता कमी केली जाते. त्यानंतर ‘शक्यते’तील गोष्टीचा ‘स्वीकारलेल्या’ वास्तवाशी होणारा संघर्ष थांबतो. जे जे अशा संघर्षाला कारणीभूत ठरते ते म्हणजेच ‘अशक्य.’

३. जाणून घेण्याच्या इच्छेच्या जोडीने येणार्‍या ‘शक्यते’च्या (किंवा अधिक नेमकेपणाने म्हणायचे झाल्यास – ‘शक्या’च्या) जाणिवेच्या बरोबर आणखी दोन गोष्टी येतात. एक, उद्दिष्टाबाबतचे आशंकायुक्त भय, विशिष्ट स्थिती खरोखरच वास्तव बनू शकते याविषयीचे भय, आणि दुसरी, त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी वापरायच्या कृती आणि साधनांविषयीचे काहीसे भय. जीवनाच्या आरंभीच्या टप्प्यावर उद्दिष्टांबाबतची जाणीव खूपच जास्त प्रभावी असते, आणि काय करणे शक्य आहे याबाबतचा शिस्तबद्ध विचार पुष्कळ नंतर येतो, अशी दाट शक्यता दिसते. वेगवेगळ्या गोष्टी प्रत्यक्ष करून बघणे आणि त्या करण्याआधी त्यांच्या शक्याशक्यतेचा विचार करणे या दोन्हींमध्ये फरक आहे. यांपैकी दुसरी गोष्ट करताना म्हणजेच आखणी करताना प्रत्यक्ष कृती करणे रोखून धरावे लागते. आणि प्रत्यक्ष करण्याऐवजी मानसिक कृतींकडे अवधान वळवावे लागते. विकासाच्या दृष्टीने पाहता, ‘बाह्य गोष्टी’कडून ‘आंतरिक गोष्टी’कडे होणारा असा हा जाणिवेचा प्रवास आहे.

४. भाषिक कौशल्यांचा विकास होतानाही असेच होते. या कौशल्यांबाबतचे भान येण्याआधीच मुलाने ही कौशल्ये आत्मसात केलेली असतात. आपण कशाविषयी बोलतो याचे भान, म्हणजेच भाषेने निर्देशित केलेल्या बाह्य गोष्टींचे भान, सर्वसाधारणपणे आधी येते. आणि कशाच्या द्वारा आपण बोलतो त्याचे भान, म्हणजे शब्दांचे भान त्यानंतर येते. आणि त्याच्या पुष्कळच नंतर त्यांच्या क्रमाबाबतच्या नियमांचे भान येते.

खरे तर त्याच्या शब्दांचा वापर या नियमांनुसारच होत असतो. (तसे बघायला गेले तर एखाद्या विचारी, मोठ्या वयाच्या व्यक्तीलाही या सगळ्या नियमांचे, प्रक्रियांचे अतिशय मर्यादितच भान असते.)

भाषिक भान पूर्ण विकसित होण्याआधी, प्रारंभीच्या टप्प्यावर, मुलाच्या दृष्टीने पाहिले तर, सोबत घडणार्‍या घटना-प्रसंगांमध्ये भाषा लपेटलेली असते. जोपर्यंत ही स्थिती असते तोपर्यंत सुट्या स्वतंत्र शब्दांचा अर्थ मूल लावतच नाही, तर एकंदर परिस्थिती समजून घेते. शब्दांचा नेमका अर्थ काय हे जाणून घेण्यापेक्षा बोलताना लोक काय ‘करतात’ याकडे त्याचे लक्ष अधिक असते. कोणीच काही बोललेले नाही अशा परिस्थितीचा अर्थ लावण्याचीही वेळ मुलावर येते, आणि असेही दिसते, की जेव्हा बोललेल्या शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते, तेव्हा मूल त्याचा काय अर्थ लावते, यावर त्याने स्वतंत्रपणे रचलेल्या संदर्भाचा मोठाच प्रभाव असतो. एखाद्या परिस्थितीच्या एखाद्या वैशिष्ट्याचा मुलावर पगडा असेल, तर कानांवर पडणार्‍या शब्दांचा अर्थ लावण्याची संपूर्ण प्रक्रिया या वैशिष्ट्याकडे खेचली जाऊ शकते. ही ‘खेच’ नेमकी किती ताकदवान असते याचा संपूर्ण उलगडा अजून झालेला नाही.

५. लोक काय बोलत आहेत याविषयी आडाखे बांधण्याचा प्रयत्न जे मूल करते, त्याच्याकडे दोन क्षमता असाव्या लागतात :

१. इतरांचा हेतू काय आहे हे ओळखणे.

२. स्वतः सहेतुक काहीतरी करणे.

असे मूल इतरांशी संवाद साधू शकते. संवाद साधण्याची त्याची अशी खास पद्धत असते. व्यक्तिगत पातळीवर मुलाने निर्माण केलेल्या नात्यांमधून एक रचना तयार होत असते, आणि त्यात शिकणे घडते.

वरील पाच वैशिष्ट्यांनी तयार होणारे हे चित्र नेमकेपणाने रेखाटलेले आहे असे मानले, तर शाळेत येणारे मूल या चित्रातल्याप्रमाणे असते. त्याची विचारकौशल्ये चांगल्यापैकी विकसित झालेली असतात. मात्र त्याचा ‘विचार’ वास्तव, अर्थपूर्ण, बदलत्या आणि अवधान विचलित करणार्‍या बाह्य जगाकडे वळलेला असतो. आपल्या शिक्षणव्यवस्थेत यशस्वी होण्यासाठी मुलाला काय शिकायला हवे, तर भाषा आणि विचार यांना आत वळवायला. आपल्या विचारप्रक्रियांना विचारपूर्वक दिशा देणे त्याला जमायला हवे. त्याला नुसते बोलता येणे पुरेसे ठरणार नाही, तर काय बोलायचे हे निवडून-वेचून त्याला बोलता यायला हवे. नुसता अर्थ लावता येणे पुरेसे नाही, तर वेगवेगळ्या अर्थांच्या शक्यता तोलून पाहता यायला हव्यात. त्याच्या ‘संकल्पनांच्या व्यवस्थे’चा इतका विस्तार व्हायला हवा, की ती व्यवस्था सक्षमतेतने पुढे येईल आणि स्वतःचेच प्रतिनिधित्व करायला पुरी पडेल. विविध प्रतीके हाताळण्याची हातोटी मुलाने मिळवायला हवी.

शाळेत येण्याआधीच्या वयात, प्रतीकांच्या ज्या व्यवस्थेपर्यंत मूल पोहोचू शकते ती प्रमुख व्यवस्था म्हणजे भाषेचे ‘तोंडी’ रूप. भाषेचे संकल्पनात्मक रूप समजून घेण्याची पहिली पायरी म्हणजे तिच्या स्वतंत्र रचनेची जाणीव होणे, प्रसंगाशी असलेल्या तिच्या जोडलेपणातून तिला मुक्त करणे.

काही मुले शाळेत यायला लागण्याआधीच या टप्प्यावर पोचलेली असतात. त्यांच्या दृष्टीने हे खूपच फायदेशीर असते.

बेरबेल इनहेल्डर आणि त्यांचे सहकारी यांनी केलेल्या एका अभ्यासाचे निष्कर्ष थोडक्यात असे मांडता येतील :

मुलांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे अशा परिस्थितीत मुलांची भाषेकडे बघण्याची दृष्टी निर्णायक ठरते. भाषिक दृष्ट्या समृद्ध पार्श्वभूमी असलेल्या मुलांच्या आणि वंचित मुलांच्या, भाषेकडे बघण्याच्या दृष्टीत फरक असतो. समृद्ध पार्श्वभूमीतून आलेली मुले प्रश्नातला शब्द न शब्द बारकाईने समजून घेतात, त्यावर चिंतन करतात, त्यांचे विश्लेषण करतात आणि मगच उत्तर देतात. याउलट वंचित गटातील मुलांचा कल मूळ प्रश्नाचे, सहज-स्वाभाविक प्रश्नात रूपांतर करण्याकडे दिसतो. भाषा विशिष्ट संदर्भापासून सुटी करून तिचा अमूर्त वापर करण्याची क्षमता कमावण्याची पूर्वतयारी या दोन प्रकारच्या मुलांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळते. बौद्धिक आणि साक्षरतेचे वातावरण असलेल्या घरांमधून येणार्‍या मुलांमध्ये ती पूर्वतयारी जास्त आढळते.

साक्षर असलेली मोठी माणसे म्हणून लिखित शब्दाला आपण इतके सरावलेलो असतो, की बोललेल्या शब्दापेक्षा तो किती विलक्षण वेगळा असतो याचा विचार करायला आपण क्वचितच थबकतो. बोललेला शब्द क्षणार्धातच टिकतो, बदलत्या प्रसंगांच्या साखळीत गुंतलेला तो एक घटक असतो, तो लगेच विरून जातो. स्वतंत्रपणे त्याविषयी विचार करायचा असेल, तर त्या गुंतलेपणातून तो सोडवून घ्यावा लागतो. लिखित शब्द टिकतो. कागदावर तो राहतो; ठळक, वेगळा दिसतो. दुसर्‍या दिवशी आपण पुन्हा तो वाचू शकतो. अभाषिक अशा संदर्भापासून, एखाद्या प्रसंगापासून तो मोकळा असतो. आपण तो उचलून घेऊ शकतो. खिशात नाही तर पिशवीत ठेवू शकतो. एकदा का मूल शाळेत जाऊ लागले, की ते, पुस्तक घरी आणून शाळेत वाचलेले शब्द परत आईला वाचून दाखवू शकते. 

अशा रीतीने मुलाचा पुस्तकांशी संपर्क येणे महत्त्वाचे असते. त्यातून, भाषा म्हणून भाषेची जाणी होण्याच्या अनेक संधी निर्माण होतात. त्याआधी, बोलल्या गेलेल्या शब्दांमधून, अशा संधी मिळालेल्या नसतात.

अर्थात, काही घरांमध्ये मात्र शब्दांबद्दल मुलांशी जाणीवपूर्वक बोलले जाते, शब्दांचे विविध खेळ खेळले जातात. मात्र बहुतांश घरांमध्ये फक्त ‘शब्दांनी बोलणे’ एवढेच घडत असते. त्यामुळे शब्दांच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या जाणिवेचा लवलेशही नसलेली असंख्य मुले शाळेत येतात. ओघाने अखंड बोलण्याचे, छोटे छोटे भाग पाडता येतात हे त्यांच्या गावीही नसते. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना असे भाग पाडणे जमू लागते, असे संशोधन झाले आहे.

बर्‍याच मुलांचा लिखित भाषेशी पहिला संपर्क येतो तो पुस्तकातील गोष्टी ऐकण्यातून. हा संपर्क ‘अप्रत्यक्ष’ प्रकारचा. प्रत्यक्ष कागदावरचे शब्द पाहून, त्यांच्याशी भिडण्यातून शब्दांबद्दलची जाणीव जशी विकसित होते, तसे गोष्ट ऐकताना घडत नाही. मुले गोष्ट ऐकतात तेव्हा गोष्टीच्या भाषेबद्दलचे प्रश्न फार कमी वेळा विचारतात. गोष्टीतल्या घटना, व्यक्तिरेखा यांना धरून त्यांचे प्रश्न असतात. सुमारे चार महिने रोज गोष्टीच्या तासाला नोंदी ठेवल्या गेल्या. त्यांत शब्दांच्या अर्थाबद्दल अवघे तीन प्रश्न मुलांनी विचारलेले आढळले.

वस्तू आणि शब्द यांच्या नात्याशी जोडलेला एक प्रश्न अगदी लहान वयात मुले विचारतात. ‘हे काये?’ मात्र तरीही, शब्द असतात याची जाणीव पुष्कळ उशिराने निर्माण होते.

आरंभीच्या काळात, वस्तूचे मुलाला भावलेले, जाणवलेले एखादेच वैशिष्ट्य (वजन, रंग, स्पर्श...) आणि वस्तूचे नाव यांची सांगड मुलाच्या मनात बसू शकते. वायगॉटस्की या तज्ज्ञाच्या मते, पौढांच्या मनातही अशी सांगड असू शकते.

आपले विचार आपण नियंत्रित करू शकणे आणि आपण ते करू शकतो याची जाणीव असणे या दोन गोष्टींत फारसे अंतर नाही. मुलाचे आत्मभान या संदर्भात महत्त्वाचे ठरते. वायगॉटस्की म्हणतात, ‘...एखाद्या कृतीवरचे नियंत्रण म्हणजे त्या नियंत्रणाविषयीच्या जाणिवेचीच दुसरी बाजू होय...’

आत्मभान कसे विकसित होत जाते याविषयी अद्याप आपल्याला पुरेशी माहिती नाही. पियाजे यांनी या संदर्भात अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष रोचक आहेत. त्यांनी मुलांना अगदी सोप्या कृती करायला दिल्या आणि आपण काय करतो आहोत याविषयी बोलायला सांगितले.

पियाजेंच्या निष्कर्षांचे स्वरूप गुंतागुतीचे आहे, पण त्या निष्कर्षांमधून एक गोष्ट निष्पन्न होते आणि ती म्हणजे जेव्हा आपण काहीसे थांबतो तेव्हाच ‘जाणीव’ विकसित होते. आपण अनेक शक्यतांचा विचार करतो, तेव्हा वास्तवाबाबतची आपली जाणीव अधिक धारदार होते. आपण कदाचित काय केले असते, जे खरे तर आपण केले नाही याचे भान आपल्याला येते आणि ते, आपण काय करतो आहोत याच्या जाणिवेबरोबरच येते. ‘निवडी’ची संकल्पना या सगळ्याच्या मुळाशी आहे.

जे आपल्याला जरासे थबकून विचार करायला भाग पाडते, म्हणजेच विशिष्ट निवड करून आपल्या विचाराला एका दिशेपेक्षा दुसरी दिशा देते, ते नेमके काय असते ? या प्रश्नाला साधे सुटसुटीत उत्तर नाही. परंतु इथे पुन्हा वाचायला शिकण्याचा वाटा फार महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण ठरतो. जे मूल वाचायला शिकत असते, ते एका विशिष्ट परिस्थितीत असते आणि ती परिस्थिती त्याला ‘याचा अर्थ काय असेल बरे?’ अशा विचारात पाडते. एक मूल म्हणाले होते : “आपल्याला थांबून विचार करावा लागतो ! ते सोपं नसतं !”

लिखित शब्द टिकाऊ असतो. तो विशिष्ट अ-भाषिक घटनांशी बांधलेला नसतो. इथे, विविध शक्यतांमधून निवड करण्याची गरज बाजूला सारली जात नाही, कारण शब्दाचा अर्थ ठरवून टाकायला घटनेचा संदर्भ नसतो. लिखित शब्द टिकतो, हे त्याचे वैशिष्ट्य असल्यामुळे मुलाला थांबून शक्यतांचा विचार करण्याची संधी मिळते. अशी संधी त्याला आधी कधीच मिळालेली नसण्याची शक्यता असते.

थोडक्यात, लिखित शब्दाची जी वैशिष्ट्ये भाषिक जाणिवा वाढवतात, तीच वैशिष्ट्ये आपल्या स्वतःच्या विचाराबाबतचे भानही वाढवत असावीत. अशा रीतीने, ‘बौद्धिक आत्मनियंत्रणा’च्या विकासालाही ती हातभार लावत असावीत; पर्यायाने, तार्किक, गणिती आणि वैज्ञानिक विचारांच्या विकासावर अगणित परिणाम करत असावीत.