भाषा आणि कला - जेन साही
श्रीमती जेन साही यांच्या ‘शिक्षणातील कलेचे स्थान’ या अप्रकाशित पुस्तकातून ‘भाषा आणि कला’ हा प्रस्तुत उतारा घेतला आहे.
मुले जेव्हा आपला अनुभव प्रतीकांच्या माध्यमातून मांडायला शिकतात, आपले विचार आणि कल्पना इतरांपाशी व्यक्त करू लागतात तेव्हा त्या प्रक्रियेत ती भाषा, अनुकरण आणि सर्जनशीलता या तीन गोष्टी माध्यम म्हणून वापरत असतात. भाषा म्हणजे फक्त बोललेले शब्द नव्हेत, तर दृक्-भाषासुद्धा. प्रतिमांची दृक्-भाषा आणि शब्द एकमेकांशी जवळून जोडलेले असतात. ते दोन्ही एकत्र प्रकट होतात, ते नाटक बाहुलीनाट्य,गोष्ट सांगणे अशा प्रसंगी.
श्रीमती जेन साही यांच्या ‘शिक्षणातील कलेचे स्थान’ या अप्रकाशित पुस्तकातून ‘भाषा आणि कला’ हा प्रस्तुत उतारा घेतला आहे.
मुले जेव्हा आपला अनुभव प्रतीकांच्या माध्यमातून मांडायला शिकतात, आपले विचार आणि कल्पना इतरांपाशी व्यक्त करू लागतात तेव्हा त्या प्रक्रियेत ती भाषा, अनुकरण आणि सर्जनशीलता या तीन गोष्टी माध्यम म्हणून वापरत असतात. भाषा म्हणजे फक्त बोललेले शब्द नव्हेत, तर दृक्-भाषासुद्धा. प्रतिमांची दृक्-भाषा आणि शब्द एकमेकांशी जवळून जोडलेले असतात. ते दोन्ही एकत्र प्रकट होतात, ते नाटक बाहुलीनाट्य,गोष्ट सांगणे अशा प्रसंगी.
गोष्टी वगळून आपल्या जीवनाची कल्पना करणे जवळजवळ अशक्य आहे ! तसे केले, तर आपल्या जीवनातला गाभाभूत असा भागच उणावल्यासारखे होईल, रंगहीन जग किंवा चवहीन अन्न अशासारखेच ते होईल. लहान मुले असोत वा मोठी माणसे, गोष्टी आपल्या जीवनाचा कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या गोष्टी सांगतो आणि ऐकतो. हजारो वर्षे हे चालू आहे. माणसाला माणूस बनवण्यात गोष्टींचा मोठा वाटा आहे.
चित्र आणि शब्द
हावभाव, कृती, शब्द आणि चित्रे यांचा वापर करून गोष्टी सांगितल्या जातात. बाहुल्या, छायाबाहुल्या, मुखवटे,नृत्य, चित्रे, मूर्ती यांचा वापर करून, विविध दृक-माध्यमांच्या द्वारा गोष्टी सांगण्याच्या समृद्ध परंपरा भारतात आहेत. दृक-प्रतिमा आणि शब्द गोष्टींमध्ये एकमेकांना बळकटी आणतात. चित्रे, प्रतिकृती यांचा वापर करण्यामुळे मूल अधिक नेमकेपणाने गोष्ट सांगू शकते किंवा समजून घेऊन शकते. लहान मुलाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर रंग, रेषा, हालचाली, चित्राचा पोत हे गोष्टीत महत्त्वाचे ठरतात.
शब्द आणि वाक्य बोलू लागण्याच्या फार आधीपासूनच बाळ वेगवेगळे साहित्य हाताळत असते. वस्तू आणि आवाज यांच्याशी खेळता-खेळता मूल जगाला समजून घेत असते. हळूहळू मुलाला उमगते की वस्तू बदलू शकतात, बदलता येतात.
अनुभवाचे वर्णन करण्यासाठी वा भावना व्यक्त करण्यासाठी मूल जसजसे शब्द वापरायला लागते, तसतसे रंगरेषांची भाषाही मूल शिकत जाते. मूल जी चित्रे काढते, त्यात त्याला महत्त्वाच्या वाटणार्या गोष्टी उमटतात,त्यात जगाबद्दलची मुलाची समज प्रतिबिंबित होते.
गोष्टीत शब्द आणि प्रतिमा, तर्क आणि भावना एकत्र येतात. गोष्टीतले शब्द मुलाला चित्राच्या रचनेत मदत करतात आणि चित्र काढण्याची, भाषा वापरण्याच्या क्षमतेच्या वाढीला मदत होते. शब्द आणि प्रतिमा यांची वीण घट्ट असते. आवाज आणि हालचाली या दोन्हींमधून मुलाची गोष्ट आकार घेते.
चित्र आणि शब्द हातात हात घालून येतात याचे उदाहरण पाहिले, तर एखाद्या चित्रामधे मुलाचा किती विचार दडलेला असतो हे लक्षात येते. साडेचार वर्षांच्या मुलीने एक चित्र काढले होते. थोडे माझ्यासाठी, थोडे स्वतःसाठी असे वर्णन करत करत ती चित्र काढत होती. आदल्या दिवशी तिने एक मेलेला श्रू पाहिला होता. (श्रू = छोट्या उंदरासारखा प्राणी) आणि तो बागेत पुरण्यासाठी मदत केली होती. त्याआधी सुमारे आठवडाभर तिने चेटकिणीची गोष्ट ऐकली आणि पाहिली होती. गोष्ट आणि तिचे चित्र कसे विकसित होत गेले हे पाहण्यासारखे आहे.—
मोठे वर्तुळ काढत – “हे चेटकिणीचं पोट...”
दुसरे वर्तुळ काढत – “हे तिचं डोकं आणि हे तोंड. ती ते झाकून घेते म्हणून ते असं दिसतं.”
श्रूचे चित्र काढत – “हा श्रू आहे.” त्याच्या भोवती तपकिरी रेघ ओढत “आणि ही त्याची टोपली.” केशरी रंगाने रंगवत – “हे त्याचं पांघरूण. चेटकिणीनी दिलेलं.”
पुन्हा चेटकिणीकडे वळत – “चेटकिणीचे कपडे लाल आहेत आणि केस हिरवे. केस अस्से कानाभोवती वळलेले आहेत.”
अक्षरांसारखे काहीबाही आकार गिरगटत – “हा चेटकिणीच्या शापाचा मंत्र आहे ! वाचून दाखवू ?” मग ते ‘शब्द’ तिने वाचून दाखवले, “चट्टामट्टा करायचा नाही तर एक झापड बसेल!” “हा पिवळा कागद चेटकिणीनी छताला लटकवलाय्. चेटकीण इतकी उंचय् की ती सहऽज छताला हात लावू शकते!”
काळ्या रेघा काढत – “हा अंधार आहे.”
“तुला माहितेय? श्रू चेटकिणीला मदत करतो. एका भोकातून तो बाहेर जातो आणि अंधारात पण त्याला दिसतं...”
निळ्या रंगाने रंगवत – “आता मी चेटकिणीला आणि श्रूला प्यायला थोडं पाणी काढते. चेटकिणीच्या मित्राकडे एक तळंय्. चेटकिणीचं पाणी संपलं की तो तिला तळ्यातलं पाणी देतो.”
शेवटी तिने चेटकिणीच्या अंगरख्यावर नक्षी काढली.
गोष्टींचा जन्म कसा होतो ? :
गोष्टी आपल्या जीवनाच्या गोष्टीशी निगडितच असतात. आपल्या अवतीभवतीच्या वस्तू, माणसे, प्रसंग यांच्या आठवणीतून आणि आपल्या अनुभवांमधून गोष्टींचा जन्म होतो.
आपण आपलीच गोष्ट सांगत असतो. रस घेऊन ऐकणारे कोणी असेल, तर अगदी बालवयाच्या मुलांनाही आपल्या अनुभवांबद्दल सांगायला आवडते. नव्या विस्मयकारक आणि थरारक अशा कशाहीविषयी गोष्ट असू शकते. नवजात वासरू, नवे कपडे, खड्डा खणणारे कुत्र्याचे पिलू, अगदी उतू गेलेल्या दुधाचीही गोष्ट बनू शकते !कधी कधी दुःखी, उदास अनुभवाबद्दलही मुलांना बोलायचे असते – एखादे भांडण, धडपड, कबूल केलेले न पाळल्यामुळे झालेला हिरमोड....
मुलाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले असे काहीतरी मुलाच्या चित्रात प्रतिबिंबित होणे महत्त्वाचे. मग ते भीती,अन्याय, द्विधा मनःस्थिती असे शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेरचे का असेना !
गोष्टी जशा आपल्या भोवतालातून जन्माला येतात, तशा त्या आपल्या आतूनही जन्मतात – आपल्या भावना,आशा, आपली स्वप्ने, आपली भीती यांतून.
गोष्टींची मुलांना खूप प्रकारे मदत होते. मुले नवनवीन प्रकारे विचार करायचे मार्ग चोखाळू लागतात, आपण कसकसे असू शकतो याचा विचार करतात, आणि मोठ्या जगाचा भाग बनण्यासाठी सज्ज होतात.
व्याकरणाचे किंवा शब्दसंग्रहाचे स्वाध्याय सोडवून मूल भाषा शिकत नाही. ऐकून ऐकून मुले भाषा शिकतात.अवतीभवती जे घडत असेत, त्या सक्रियपणे सहभागी होत होत मुले भाषा शिकतात. बोलण्यामागे,सांगण्यामागे काहीतरी हेतू असतो या जाणिवेतून मुले भाषा शिकतात. अशाच तर्हेने अवतीभवती असणार्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून ऐकून, इतर मुलांबरोबरच्या बोलण्यातून मुले गोष्टींची चित्रे काढू लागतात.
आपल्या गोष्टीवर, आपण ऐकलेल्या गोष्टींचा आणि पाहिलेल्या चित्रांचा प्रभाव असतो. शाळाशाळांमधून मुलांना तर्हेतर्हेचे दृक-साहित्य दाखवले गेले पाहिजे, जेणे करून मुलांना विविध कल्पना स्फुरतील, त्यांची कल्पनाशक्ती फुलेल.
काही वेळा एकमेकांशी बोलताना गटातही मुलांची गोष्ट आकाराला येते.
गोष्टीतून आपल्या विचाराला दिशा मिळते. गोष्ट सांगणार्याबरोबरच गोष्ट ऐकणाराही असावा लागतो. मुलांसाठी शिक्षक श्रोत्याची भूमिका करू शकतो. त्या वेळी मूल्यमापनात्मक भूमिका करण्यापेक्षा मुलांना प्रोत्साहन देत देत ऐकणे महत्त्वाचे.
गोष्टींच्या सहवासात मुलांची सर्जनशीलता वाढते. गोष्ट ऐकताना प्रत्येक मूल आपल्या तर्हेने तिचा अर्थ लावते. गोष्टीतल्या एखाद्या नव्या कल्पनेमुळे मनाचे, विचाराचे नवीन कवाड उघडते.
गोष्टी सांगण्याचे, वाचून दाखवण्याचे, ऐकण्याचे, रचण्याचे महत्त्व अनन्य असे आहे.
‘कृष्णमूर्ती ऑन एज्युकेशन’ या पुस्तकातील मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी कृष्णमूर्तींनी केलेल्या भाषणामधील वेचक भागांचा हा सारांश आहे. हे पुस्तक कृष्णमूर्ती फौंडेशन, इंडिया, यांनी १९९८ साली पुनःप्रकाशित केले आहे.
सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे ‘क्वेस्ट’करिता