Skip directly to content

बालरंगभूमीसाठी गोष्टरंग पाठ्यवृत्ती (फेलोशिप) २०१७-२०१८

तुम्हाला नाटक आणि रंगभूमी या विषयांत रस वाटतो का?

तुम्ही नाट्य-प्रशिक्षण घेतलं आहे का?

तुम्हाला बालरंगभूमीबद्दल आस्था वाटते का?

ग्रामीण भागात काही महिने कामाचा अनुभव घ्यायला तुम्हाला आवडेल का?

तुम्ही २०-३५ वयोगटातले आहात का?

एका आगळ्या वेगळ्या फेलोशिपबद्दलची ही माहिती वाचा

आणि इंटरेस्टिंग वाटल्यास लवकर अप्लाय करा.

 

‘गोष्टरंग’बद्दल

‘गोष्टरंग’ हा क्वेस्ट या सामाजिक संस्थेचा एक आगळा वेगळा शैक्षणिक उपक्रम आहे. ग्रामीण आणि आदिवासी विभागात वाचन संस्कृती अजूनही म्हणावी तशी रुजलेली नाही. अशा भागातल्या मुलांसाठी बालसाहित्यातल्या किंवा मुलांच्या पुस्तकांतल्या गोष्टी सादर केल्या, तर त्यांना वाचन – लेखनाची ओढ वाटू शकेल या अपेक्षेने क्वेस्ट आणि तारपा (क्वेस्टचा सांस्कृतिक उपक्रम) यांच्याद्वारे २०१६ मध्ये ‘गोष्टरंग’ हा कार्यक्रम सुरू केला. मराठी भाषेत लहान मुलांच्या गोष्टींचे सादरीकरण करण्याच्या या कार्यक्रमासाठी नाटक आणि सादरीकरणाची आवड असणाऱ्या तरुण मुलांना निवडलं. मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक चिन्मय केळकर यांनी त्यांना प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षित तरुणांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या सहा गोष्टी निवडून त्या बसवल्या. या गोष्टींचे ‘प्रयोग’ वर्षभर पालघर जिल्ह्यात आश्रम शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांत झाले, आणि पुण्यात महानगरपालिकेच्या शाळांतही झाले. सादर होणाऱ्या गोष्टी आणि पुस्तकांवर आधारित खेळही या तरुणांनी मुलांसोबत घेतले. मुलांना हे प्रयोग फारच आवडले! शिवाय पुस्तकांविषयी त्यांना वाटणारं कुतूहल प्रत्येक प्रयोगानंतर दिसून येत होतं.

 

बालरंगभूमीसाठी गोष्टरंग पाठ्यवृत्ती (फेलोशिप) २०१७-१८

या वर्षभराच्या अनुभवावरून आता हा कार्यक्रम थोड्या वेगळ्या रूपात करायचं ठरवलं आहे. कारण नुसत्याच गोष्टी सादर न करता त्यासोबत वाचन-लेखनाबद्दल विविध खेळ आणि कृती घेण्यासाठी रीतसर नाट्य प्रशिक्षण घेतलेल्या किंवा रंगभूमीचा अनुभव असलेल्या तरुण व्यक्तींची गरज वाटते आहे. या फेलोशिपद्वारे अशा तरुणांना बालरंगभूमीच्या क्षेत्रात काम करण्याचा सकस अनुभव मिळेल. गोष्टी सांगणं, पुस्तकं वाचणं, नाटक पाहणं अशा सांस्कृतिक घटना जिथे अभावानेच घडतात अशा ग्रामीण आणि आदिवासी विभागात काम करायची संधी मिळेल. शहरी मुलांपेक्षा या भागातल्या मुलांचा प्रतिसाद वेगळाच असतो. नाट्यक्षेत्रातल्या कारकीर्दीसाठी हा एक समृद्ध करणारा अनुभव ठरेल. नऊ महिन्याच्या या फेलोशिपसाठी आम्ही ५ जणांची निवड करणार आहोत. त्यांना एका निवासी कार्यशाळेत प्रशिक्षण दिलं जाईल. त्यानंतर या ग्रूपने शाळांमधून प्रयोग करावेत आणि त्यासाठी लागणारी तयारी, आयोजन हे सर्व सांभाळावं अशी अपेक्षा आहे. फेलोशिपच्या कालावधीत दर महिन्याला स्टायपेंड दिला जाईल, ज्यातून किमान राहण्या-जेवण्याचा खर्च निघू शकेल आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची काळजी न करता फेलोज कार्यक्रमावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतील.

 

ही फेलोशिप कोणासाठी?

२०-३५ वयोगटातल्या उत्साही तरुण-तरुणींसाठी

नऊ महिन्याच्या पूर्णवेळ फेलोशिपसाठी वेळ देऊ शकणाऱ्यांसाठी

नाट्य / रंगभूमी या विषयाची पदवी / पदविका किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेल्यांसाठी, किंवा तशा प्रकारचा अनुभव असणाऱ्यांसाठी

 

निवडलेल्या फेलोजकडून आमच्या मुख्य अपेक्षा

मराठी बोलता येणं अनिवार्य

शारीरिक सुदृढता अतिशय आवश्यक

ग्रामीण भागात अगदी साधारण सोयी-सुविधांसह राहण्याची तयारी

ग्रामीण आणि आदिवासी भागांत उपलब्ध परिस्थितीत आणि कमीत कमी सोयी-सुविधांसह गोष्टी सादर करण्याची तयारी

कम्प्युटर वापरता येत असेल तर अधिक उपयुक्त होईल 

 

फेलोशिपचे मुख्य मार्गदर्शक

गीतांजली कुलकर्णी (प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर)

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची पदवीधर, प्रायोगिक रंगभूमीवर लीलया वावरणारी, ‘पिया बहुरूपिया’ या नाटकाद्वारे ग्लोब थियेटर गाजवणारी अभिनेत्री. ‘कोर्ट’ या गाजलेल्या मराठी चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका आहे. क्वेस्टच्या तारपा आणि गोष्टरंग या उपक्रमांद्वारे अभिनय आणि शिक्षण यांची सांगड घालत कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही देते.

विद्यानिधी (प्रसाद) वनारसे

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे पदवीधर, नाट्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रात २० वर्षांचा अनुभव. इंटरनॅशनलअसोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्सअँडरिसर्च (IAPAR) चे संस्थापक–संचालक. त्यांना भारतात आणि परदेशातही अनेक युनिव्हर्सिटीज आणि नाट्यशिक्षणाच्या संस्थांमध्ये प्रशिक्षक आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून निमंत्रित केलं जातं.   

 

कामाचं ठिकाण

महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागात, आश्रम शाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांत मुख्यतः काम करावं लागेल. काही प्रयोग शहरी / निमशहरी भागांत असू शकतील.

 

फेलोशिपचा कालावधी

९ महिने, पूर्ण वेळ (१ जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१७)

 

पाठ्यवृत्ती / स्टायपेंड

दरमहा रु. १८,०००/-

(निवड झाल्यानंतर काही कारणास्तव ही फेलोशिप अर्ध्यातच सोडावी लागली तर तोपर्यंत मिळालेली रक्कम संस्थेला परत करावी लागेल)

 

निवड झालेल्या फेलोजना खालील कामं करावी लागतील

  • निवासी कार्यशाळेत पूर्ण वेळ सहभाग
  • गोष्टींची निवड आणि सादरीकरण यासाठी नव्या कल्पना सुचवणं, त्या कार्यान्वित करायला मदत करणं
  • क्वेस्ट आणि तारपा टीमच्या सहयोगाने शाळांमध्ये कार्यक्रम आयोजित करणं
  • अशा कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी घेणं आणि ते व्यवस्थित पार पाडणं
  • छोट्या मुलांसाठी २-३ दिवसांच्या ‘नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा’मध्ये शिकवणं आणि मदत करणं
  • ग्रामीण भागात अगदी साधारण सोयी-सुविधांसह राहणं 
  • ग्रामीण आणि आदिवासी भागांत उपलब्ध परिस्थितीत आणि कमीत कमी सोयी-सुविधांसह गोष्टी सादर करणं
  • फेलोशिप कालावधीतले शिकण्याचे अनुभव आणि प्रत्यक्ष प्रयोगांचे अनुभव सतत नमूद करणं
  • मासिक अहवाल लिहिणं

 

निवास व्यवस्था

राहण्याची जागेची व्यवस्था आणि कार्यक्रमासाठी होणारा प्रवासखर्च संस्थेतर्फे केला जाईल.

 

निवड प्रक्रिया

अर्जदारांसोबत अर्ध्या दिवसाची कार्यशाळा आणि मुलाखत

 

महत्त्वाच्या तारखा

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - १० मे २०१७

मुलाखतीसाठी निवडलेल्यांना ३१ मेपर्यंत कळवण्यात येईल

अर्ध्या दिवसाची कार्यशाळा आणि मुलाखत १० – १५ जून दरम्यान होईल (याचं ठिकाण नंतर कळवण्यात येईल)

फेलोशिपसाठी ५ जणांची निवड २० जूनला जाहीर होईल

फेलोशिप आणि निवासी कार्यशाळेची सुरुवात - १ जुलै २०१७

 

सोबत जोडलेला अर्ज भरून तुमच्या पासपोर्ट साईझ फोटोसहित खालील पत्त्यावर पाठवा :

डाऊनलोड फॉर्म

ईमेल – quest@quest.org.in

किंवा

पत्ता – रो हाउस नं. १, अलकनंदा सोसायटी, मंत्री पार्कजवळ, कोथरूड, पुणे – ४११०३८

 

अधिक माहितीसाठी संपर्क: शची शहा +91 9819800289