Skip directly to content

प्रारंभीचे वाचन शिकवणे - महाराष्ट्रातील अनुभव

मॅक्सिन बर्नटसन (२००४) यांचे अप्रकाशित टिपण

सारांशात्मक मराठी रूपांतर – वर्षा सहस्रबुद्धे, ‘क्वेस्ट करिता’

 अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये प्रारंभीचे वाचन शिकवण्याच्या पद्धती हा दीर्घकाळ वादाचा मुद्दा राहिला आहे. अक्षर आणि त्याचा उच्चार याप्रमाणे प्रत्येक अक्षर वाचायला शिकवण्यावर भर असलेली, ‘फोनिक’पद्धत परंपरेने प्रचलित होती. १९३०च्या दशकात नवीन पद्धत स्वीकारली गेली. ही ‘साईट वर्ड’पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीत मुले, अंदाजे पन्नासएक शब्द ‘पाहून ओळखायला’ शिकतात. रुडोल्फ फ्लेश यांच्या ‘जॉनीला का वाचता येत नाही?’ या पुस्तकामुळे १९५५ मध्ये या पद्धतींवर पुष्कळ प्रयोग झाले आणि अटीतटीचे वाद होत राहिले आहेत. काही वादांना राजकीय रंगही होता. कॉन्झर्वेटिव्हज् पारंपरिक पद्धतींकडे वळा असे सांगत राहिले. तेव्हापासून मुळाक्षर पद्धतीवर भर देणार्‍या अनेक वाचन-पद्धती पुन्ही वापरल्या जाऊ लागल्या. नुकताच, काही मंडळींनी ‘संपूर्ण भाषा पद्धती’चा पुरस्कार केला आहे.

दुसरीकडे, भारतात, प्रारंभीचे वाचन शिकवण्याच्या पद्धतींवर फारसे वाद वा प्रयोग झालेले नाहीत. कालांतराने पश्चिमेकडचे शहाणपण स्वीकारून मोकळे व्हायचे असे पुष्कळदा घडले आहे. बर्‍याचशा भारतीय भाषांच्या लिपी आणि इंग्रजी यांचे वाचन शिकण्यात येणार्‍या अडचणींमध्ये महत्त्वाचा फरक आहे, हे कोणी निदर्शनाला आणून दिल्याचे मला तरी माहीत नाही. इंग्रजीतील स्पेलिंगची व्यवस्था गोंधळाची आहे कारण ती फार पूर्वी बसवली गेली. त्यामुळे, उच्चार बदलत गेले तरी स्पेलिंग तीच राहिली. अशा प्रकारे, एका अक्षराचे अनेक उच्चार होतात आणि एखाद्या उच्चारासाठी वेगवेगळी अक्षरे वापरली जाऊ शकतात. थोडक्यात अक्षरे आणि उच्चार यांची जोडणी ढिसाळ आहे. 

भारतीय भाषांच्या बाबतीत चित्र अगदी वेगळे आहे. उदारहणार्थ, काही अपवाद वगळता, मराठीत देवनागरीच्या प्रत्येक लिपिचिन्हाशी एकच उच्चार जोडलेला आहे, तसेच प्रत्येक उच्चारासाठी एकच लिपिचिन्ह शिकवण्यापेक्षा मराठी वाचायला शिकवणे सोपे असायला हवे. उच्चार आणि अक्षरे यांचा हा संबंध, हा वाचन शिकवण्याच्या भारतातील पद्धतीचा महत्त्वाचा भाग होता. क्रमाने मुळाक्षरे लक्षात ठेवणे आणि ओळखणे या पद्धतीने मुले शिकत. मुळाक्षरांचा पारंपारिक क्रम हा संस्कृत पंडितांनी, त्यांचे उच्चारणस्थान आणि उच्चारणपद्धत लक्षात घेऊन केलेल्या वर्गीकरणावर आधारलेला आहे. एकेका अक्षराबरोबर मूल त्या अक्षराने सुरू होणारा शब्द पाठ करत असे, जसे इंग्रजीत ए फॉर अ‍ॅपल. मुळाक्षरे शिकून झाली की मूल बाराखडी चिन्हे शिकत असे. मुळाक्षरांना जोडून येणारी संक्षिप्त स्वरचिन्हे, अनुस्वार आणि विसर्ग यांचा त्यात समावेश होता. कदाचित भारतीय लिपींमधील धूसर भाग हाच असावा. एकदा का मुलाने सर्व चिन्हांवर प्रभुत्व मिळवले, की मग शब्द, वाक्ये, गद्य-पद्य वेचे शिकवले जात.

या तर्काधिष्ठित, व्यवस्थित पद्धतीने करोडो भारतीय वाचायला शिकले आहेत. परंतु, जेथे वर्गात अनेक मुले ही वाचायला शिकणारी पहिलीच पिढी असते, तेथे या पद्धतीतील त्रुटी जाणवतात. अर्थपूर्ण मजकूर वाचायला लागेपर्यंत या पद्धतीत खूप मोठा काळ जातो. सर्व मुळाक्षरे व इतर चिन्हे शिकेपर्यंत वेळ तर लागतोच, शिवाय खूप चिकाटीही लागते. जेथे घरचे वातावरण वाचनाला पोषक आहे तेथे ही पद्धत उपयोगाला येते.

बालभारतीची पाठ्यपुस्तके :

१९६० साली महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजे १९६८ साली राज्य शासनाने ‘बालभारती’ची उभारणी केली. बालभारती म्हणजेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ. त्यानंतर थोड्याच काळात पहिले पाठ्यपुस्तक प्रकाशित झाले. त्यात दिसणारी लेखकांची कल्पकता, संवदेनशीलता आणि उत्तम अशी शिक्षणशास्त्रीय जाण पाहून, आज पुस्तक पाहतानाही मी थक्क होते...! पुस्तकातील चित्रे चांगली आहेत, त्याचा कागद चांगला आहे, पुस्तक चांगले बनवले आहे. ही चांगली वैशिष्ट्ये बालभारतीने आजतागायत टिकवली आहेत. त्याकाळच्या अमेरिकन पाठ्यपुस्तकातल्याप्रमाणे प्रत्येक धडा एक-दोन वाक्यांनी सुरू होतो – धड्यातले शब्द आणि चिन्हे यांची त्यात ओळखही करून दिली जाते. पहिल्या तीन धड्यांमध्ये काना-उकार, वेलांटी-मात्रा इत्यादि चिन्हे नसलेली वाक्ये आहेत. चौथ्या धड्यात कान्याची ओळख होते. पुढे बाकीची बाराखडीचिन्हे येतात. थोडक्यात, मुलांची सगळ्या मुळाक्षरांशी ओळख करून दिली आहे. सहाव्या धड्यातच मुलांना, असा त्यांना भावणारा उतारा वाचायला मिळतो –

बाळ

बाळ बघा, बाळाचा पाळणा बघा.

आई, दाखव ना मला बाळ.

हात मऊ, पाय मऊ.

नाक लहान, कान लहान.

इवलासा बाळ. छान छान बाळ.

चल चल बाळा. पायात वाळा.

यामधल्या काही वाक्यांमध्ये असलेल्या साहित्यिक दर्जाने मी प्रभावित झाले ! त्याकाळच्या किंवा आधीच्या काळातल्या कवींचे लेखन पाठ्यपुस्तकासाठी वापरले आहे : सरला देवधर, ताराबाई मोडक, ग.ह. पाटील, वि.म. कुलकर्णी वगैरे.

१९७६ साली बालभारतीची सुधारित आवृत्ती निघाली. यातही ‘वाक्यपद्धत’ वापरली आहे. मात्र सर्व मुळाक्षरांशी परिचय होईपर्यंत यात बाराखडीचिन्हे शिकवलेली नाहीत. त्यामुळे पहिले १६ धडे पाहिले, तर त्यात अशी काहीशी कृत्रिम वाक्ये पाहायला मिळतात:

आई, घर बघ. शरद, घर बघ. अभय, नळ बघ. जगन अंगण बघ. शरद, चटई आण.

आधीच्या बाळाच्या धड्याशी तुलना केली तर ही वाक्ये किती रुक्ष वाटतात ! १९६७च्या आवृत्तीत, उत्तरार्धात मात्र आधीच्याच पुस्तकातील काही कविता आहेत.

१९७८ साली जेव्हा मी मुलांबरोबर काम सुरू केले. तेव्हा मुलांना वाचनात येणार्‍या अडचणी समजून घेण्याची मला संधी मिळाली. बहुतांश मुले घोकंपट्टी करून वाक्य शिकत आणि शब्दांच्या किंवा वाक्याच्या थोड्या भागावरून वाक्य ‘म्हणत’. जसे, ‘आई’वर बोट ठेवून शब्द दाखवला, तर मुलाने वाचले – ‘फणस उचल.’

यात पाठ्यपुस्तक बनणार्‍यांचा दोष नाही. पाठ्यपुस्तकापलिकडे जाऊन शिक्षणशास्त्रीय बाबी लक्षात घेऊन शिक्षकाने कसे शिकवायचे या जाणिवेचा अभाव आपल्याकडे आहे ही खरी दुःखाची गोष्ट आहे.

हे पुस्तक शिकवताना काही शिक्षकांनी मुलांना अक्षरओळखही करून दिली. पण असे करताना ते पुन्हा पारंपारिक पद्धतीकडे वळले. ‘बदली’ – हा शब्द मूल असा वाचत असेल, ‘ब ब बदाकचा ब ब ला काना बा, द दौतीचा, ल ल लसणाचा, ल ला वेलांटी ली’ तर ‘बादली’ या शब्दाच्या अर्थापर्यंत मूल पोचतच नाही.

१९८९ मध्ये अगदी वेगळ्याच पद्धतीचा पुरस्कार करणारे पुस्तक आले. देशभर मुलांना वाचता यावे या इच्छेने ते काढले होते. 

साधर्म्य असलेली मुळाक्षरे – उदाहरणार्थ – व ब क – एकत्र शिकवण्यावर त्यात भर होता. या अशा अक्षरांमधून एकही अर्थपूर्ण मराठी शब्द तयार होत नाही, ही अडचण येथे निर्माण झाली ! मग वड, जवस, वचक असे बोजड शब्द पहिल्याच पाठात शिकवले गेले. एकवीस वर्षांच्या काळात पहिले बालभारती आले तेव्हापासून, अर्थाच्या गाभ्याकडून, लंबक पार दुसर्‍या टोकाला लिपीतील अक्षरांच्या सांगाड्यापराशी येऊन पोचला !

१९९८ मध्ये केंद्र सरकारच्या किमान अध्ययन क्षमतांच्या आधारित कार्यक्रमांवर असे नवीन बालभारती आले. यात सुरवातीला साधर्म्य असलेली चित्रे आणि शब्द जोडण्यावर भर होता. पाचव्या धड्यापासून बाराखडीची चिन्हे शिकवायला यात सुरुवात झाली.

परंतु, पहिले सहा महिने जो भाग वापरायचा, यात फक्त शब्दांवर भर होता. वाक्य वाचण्याचा अनुभवच मुलांना त्या काळात पुस्तकातून मिळण्याची परिस्थिती नव्हती. दुसर्‍या भागात कविता, परिच्छेद होते. मात्र अगदी पहिल्या बालभारतीतल्या धड्यांच्या गोडव्याची आणि समृद्धीची सर त्यांना नव्हती.

थोडक्यात सांगायचे तर आरंभीचे वाचन कसे शिकवायचे याविषयी तज्ज्ञ मंडळींमध्ये एकवाक्यता नाही, त्याचा गंभीर विचारही केला गेलेला नाही. डी.एड.च्या अभ्यासक्रमात, वाचनकौशल्ये कशी शिकवावी याच्या पद्धतीत काही थोडेफार फेरफार झाले, पण ते थोडेफारच. स्मार्ट पी.टी.मध्येही या मुद्द्यावर फारसे काम झाले नाही.

आर्थिक-सामाजिक, तसेच अन्य घटकांवर काम करण्याची तर गरज आहेच, पण वाचनकौशल्यांच्या घटकाबाबत संकल्पनात्मक स्पष्टता असण्याचीही नितांत आवश्यकता आहे. तिथून सुरुवात होऊ शकेल...!