धामण आणि साळुंक्या
सीता आजीच्या घरामागे खूप झाडं आहेत. तिने परसात काही भाज्या पण लावल्या होत्या. त्या झाडीत बुलबुल, पोपट, तितुर साळुंक्या असे बरेच पक्षी येत. सीता आजी एक दिवस भाजी बनवत होती. तिने भाजीला फोडणी दिली आणि शिजण्यासाठी झाकणी ठेवली. तेवढ्यात तिला साळुंक्यांचा आवाज आला. तशा त्या नेहमीच कलकल करत पण आज साळुंक्यांचं ओरडणं फारच वाढलेलं आहे, हे तिच्या लक्षात आलं. आजी उठली आणि घरामागे गेली. बघितलं तर काय, परसात एक मोठा साप! मोठी धामण होती ती. साळुंक्या आणि धामण एकमेकांवर झडप घालत होत्या. साळुंक्या ओरडत ओरडत धामणीवर झडप घालत आणि धामण मान उंचावून साळुक्यांवर झडप घाले. साळुंक्या चतुर. धामणीनं थोडी मान उंच केली की समोरच्या साळुंक्या एकदम वर उडून जात. दुसऱ्या बाजूच्या साळुंक्या धामणीवर झडप घालत. मग धामण वळून त्यांच्या मागे लागे. असा अर्धा तास खेळ चालू होता. सीता आजी हे सगळ बघतच होती. शेवटी साळुंक्यांनी धामणीला मागच्या परसातून बाहेर हाकलून दिलं. आजी म्हणाली, "केवढी लांबलचक धामण होती. पण या साळुक्यांनी काय तिला इथे नांदू दिलं नाही." असं म्हणत सीता आजी घरात आली. घरात काहीतरी करपल्याचा वास पसरला होता. आजीने शिजत ठेवलेली भाजी जळून खाक झाली होती! सीता आजीनं कपाळावर हात मारला आणि म्हणाली, "बाई ग बाई! या साळुंक्यांच्या नादात भाजी घालवली हो सोन्यासारखी. आता जेवू काय?" शेवटी बरणीतली चटणी काढून ती जेवायला बसली.
सीता आजी परसात का आली ? तिला परसात काय दिसलं ?
सीता आजीची भाजी का करपली असेल ?
उतार्यात साळुंक्यांना चतुर का म्हटले आहे ?