Skip directly to content

दोरीवर चढू या !

शिबिरातल्या ताईनं एके दिवशी सांगितलं की, "उद्या आपण दोरीवर चढण्याचा खेळ खेळायचाय." ते ऐकून मनू म्हणाली, "हा कसला खेळ? दोरीवरच्या उड्या असतील का?" तिनं मनजीतला विचारलं. तो म्हणाला, "अगं, दोरीवरच्या उड्या मारताना आपण दोरीवर कुठे चढतो?" मग मनूनं वाजिदला विचारलं. पण त्यालाही हा खेळ माहिती नव्हता.
 
दुसर्‍या दिवशी मनू मैदानावर आली. तिनं पाहिलं, एका उंच झाडाला गाठी-गाठींची एक दोरी बांधली होती. ताईनं सांगितलं की या दोरीवर एकेकानं चढायचं आहे. पहिला नंबर ज्युलियाचा होता. तिनं हातात दोरी पकडली. पायाच्या बोटांनी दोरी पकडण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला ते जमेचना. शेवटी खूप मदत केल्यावर ज्युलिया दुसर्‍या गाठीपर्यंत वर चढली. आणि लगेच खाली उतरली.
 
मग वाजिद आला. तो तिसर्‍या गाठीपर्यंत गेला आणि दोरी गोल गोल फिरायला लागली. वाजिद घाबरून ओरडायला लागला. शेवटी ताईनं दोरी पकडली आणि धपकन उडी मारून वाजिद खाली आला. 
 
मग नंबर आला वनशाचा. तो पुढे यायला लाजत होता. मनूनं त्याला पुढे ढकललं. ती म्हणाली, "जा की रे लवकर. आम्हाला उशीर होतोय ना!"
 
वनशा दोरीजवळ गेला. बघता बघता सरसर चढत तो शेवटच्या गाठीपर्यंत जाऊन पोचला. सगळे जण बघतच राहिले. मग वनशा पटकन झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. वनशा झाडावरून माकडासारखा खाली उतरला.
सगळे अजुनही टाळ्या वाजवतच होते. मग ताईनं सगळ्यांना सांगितलं, की सकाळी वनशानंच झाडावर चढून दोरी बांधून दिली होती.
 
मनूला दोरीवर चढण्याचा खेळ म्हणजे कोणता खेळ वाटला?
वाजिद का ओरडायला लागला?
वनशा सोडून बाकी मुलं दोरीवर चढायला का घाबरली असतील?