Skip directly to content

चिनू मिनू

खूप पाऊस पडत होता. चिनूला खेळायला बाहेर जायचं होतं. तो पाऊस थांबायची वाट पाहत होता. पण पाऊस काही थांबेना. चिनूला खूप कंटाळा आला होता. इतक्यात कुंडीतल्या झाडावरून आवाज आला, "माझ्याशी खेळायला येशील?" चिनू दचकला. बघतो तर काय एका छोटीशी अळी! चिनूने अळीला विचारलं, "तुझं नाव काय?" "मिनू!" अळीने उत्तर दिलं. "अरे वा! माझं नाव चिनू! चिनू आणि मिनू! मज्जा!" 
 
चिनू आणि मिनूची गट्टी जमली. चिनू शाळेतून आला की मिनू खेळायला यायची. दोघे खूप खेळायचे. मिनू लपायची. चिनू तिला शोधायचा. मिनू पळायची. चिनू पकडायला जायचा. कधी दोघे शर्यत लावायचे. 
 
एक दिवस चिनू शाळेतून आला. पण मिनू खेळायला आलीच नाही. चिनूने इकडे शोधलं, तिकडे शोधलं, पण मिनू काही सापडेना. तेवढ्यात त्याला एक कोळी दिसला. त्याने कोळ्याला विचारलं, "मिनू दिसली का रे तुला?" कोळी म्हणाला, "मी तर नाही पाहिली. भिंतीवरच्या पालीला विचार." चिनू पालीकडे गेला. "माझी मिनू पाहिलीस का ग तू?" पाल म्हणाली, "नाही बाई, मोत्याला विचार. तो बाहेर बसतो ना रोज, त्याला माहीत असेल." चिनू मोत्याकडे गेला. "मिनूला पाहिलीस का रे मोत्या?", चिनूने विचारलं. "नाही बुवा, मी आताच उठलो झोपून.  तो कोंबडा आहे बाहेर त्याला विचार." चिनू गेला कोंबड्याजवळ "कोंबडेदादा, मिनू दिसली का रे तुला? तू खाल्लं नाहीस ना तिला?" कोंबडा म्हणाला, "मी कशाला खाऊ? माझं पोट छान भरलंय दाणे खाऊन." आता काय करावं बरं? चिनूला काही सुचेना. त्याने झाडावरच्या पोपटांना पण विचारलं. पण त्यांनाही काहीच माहीत नव्हतं. पोपटांनी त्याला बेडकाकडे पाठवलं. "बेडूक दादा, मिनू दिसली का तुला?", चिनूने विचारलं. "नाही, आम्ही तर इथेच बसलोय ऊन खात." चिनूला फार वाईट वाटलं. तो उदास होऊन झाडाखाली बसला. कुंपणाजवळ त्याला मुंग्यांची रांग दिसली. त्याने विचारलं, "तुम्ही पाहिलंत का मिनूला कुठे?" एक मुंगी म्हणाली, "मी पाहिलंय मिनूला. चल दाखवते तुला." चिनू मुंग्यांच्या मागे चालत एका झाडाजवळ गेला. जमिनीजवळचा एक मऊ गोळा दाखवून मुंगी म्हणाली, "ती बघ तुझी मिनू".  "हे काय झालंय तिला?" मुंगी म्हणाली, "अरे, ती कोषात गेली आहे. तिचा आता पतंग होणार आहे. तू लक्ष ठेव कोषाकडे." चिनू वेळ मिळेल त्यावेळी कोषाकडे बघत बसायचा. आणि एक दिवस कोषातून खरंच एक सुंदर पतंग बाहेर आला आणि चिनूच्या खांद्यावर बसला. चिनूने हाक मारली, "मिनू, ये". मिनू पतंग काहीच बोलला नाही पण चिनूला खात्री होती की ती मिनूच  आहे नाहीतर ती चिनूच्या खांद्यावर कशी बसली असती?