Skip directly to content

क्रमिक पुस्तकाचे अध्यापन

८.१ प्रस्तावना :

मूल भाषा कशी शिकते : श्रवण, संभाषण, वाचन, लेखन ही भाषेची मूलभूत कौशल्ये विकसित होणे का महत्त्वाचे आहे हे आपण आतापर्यंत पाहिले. या कौशल्याचा विकास होण्यासाठी पोषक असे उपक्रम व साधने यांचाही आपण अभ्यास केला. क्रमिक पुस्तक हे सर्वच शाळांमध्ये उपलब्ध असणारे एक महत्त्वाचे साधन आहे. या साधनाचा प्रभावी वापर करून मुलांच्या भाषा विकासाचा मोठा हातभार लावता येतो. क्रमिक पुस्तकातील वेचे (पाठ), कविता अभ्यासणे, त्यांचा आनंद घेणे प्रक्रियेत अनेक भाषिक कौशल्यांचा वापर मुले करताता व या वापरामुळे त्यांच्या भाषिक कौशल्यांचा विकासही घडतो. अर्थातच आपण क्रमिक पुस्तक कसे वापरतो यावर हा विकास घडणार की नाही हे अवलंबून आहे. या प्रकरणात आपण क्रमिक पुस्तकाचा प्रभावी वापर कसा होऊ शकतो हे काही नमुन्यांच्या उदाहणाआधारे अभ्यासणार आहोत.

८.२ कविता/पाठ शिकवण्यापूर्वी

क्रमिक पुस्तकातील पाठ किंवा कविता शिकवण्यापूर्वी आपल्याला काही बाबींची स्पष्टता आणायला हवी. त्या पुढीलप्रमाणे :

प्रत्येक पाठाचा किंवा कवितेचा आनंद मुलांना घेता यावा हे प्रमुख उद्दिष्ट असायला हवे.

पाठाचा/कवितेचा आशय, मध्यवर्ती संकल्पना मुलांपर्यंत प्रभावीपणे पोहचायला हवी. लेखकाला काय म्हणायचे आहे हे मुलांना स्वतःच्या शब्दात मांडण्याइतका हा आशय मुलांच्या मनाला भिडायला हवा.

प्रत्येक पाठाला/कवितेला काही भाषिक अंग असते. एखाद्या पाठात आलेली वैविध्यपूर्ण विशेषणे किंवा एखाद्या पाठात आलेली बोलीभाषा ही या भाषिक अंगाची काही ठळक उदाहरणे आहेत. पाठातले भाषिक अंग मुलांसमोर उलगडले जाणे हेही भाषाविकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

प्रत्येक पाठ/कविता हे एक साधन असते. पाठाच्या आशयाचा, भाषिक अंगाचा संबंध मुलांच्या परिसराशी, वृत्ती विकासाशी जोडणे, पाठातून सुरुवात करून पाठापर्यंत येण्याची दिशाही आपल्याला घ्यावी लागते. कोणती दिशा घ्यायची हे पाठावर व शिक्षकाच्या शिकवण्याच्या शैलीवर अवलंबून असते. पाठाच्या गरजेप्रमाणे नियोजन करण्याची लवचिकता असायला हवी.

या सर्व बाबी नीट लक्षात घेतल्या म्हणजे एक गोष्ट स्पष्ट होते. कोणताही पाठ शिकवण्यापूर्वी आपल्याला भरपूर पूर्वतयारी करायला हवी. संदर्भ शोधायला हवेत, विचार करायला हवा आणि मग मुलांसोबत पाठाचा आस्वाद घ्यायला हवा.

८.३ पाठाचे अध्यापन – एक नमुना :

इयत्ता दुसरीच्या क्रमिक पुस्तकात ‘घरचे डॉक्टर’ हा पाठ आहे. एका शाळेतील गुरुजींना हा पाठ कसा शिकवला ते आपण पाहू या. प्रथम गुरुजींना पाठ तीन-चार वेळा वाचला. पाठाच्या आशयात कोणते महत्त्वाचे मुद्दे आले आहेत याची नोंद केली ती पुढे दिली आहे.

निसर्गात आपल्या छोट्याछोट्या आजारांवर उपाय करता येतील अशी अनेक साधने आहेत हे मुलांना लक्षात आले पाहिजे.

विविध वनस्पतींचे औषधी उपयोग मुलांना माहिती झाले पाहिजेत. गरज पडल्यास त्यांचा वापर त्यांनी केला पाहिजे.

परसबाग व तिचा उपयोग मुलांना कळला पाहिजे. अशी बाग फुलवण्याचा आनंद मुलांना लक्षात आला पाहिजे.

इतरांशी केलेल्या चर्चेतून आपल्याला नवी माहिती मिळवता येते हे मुलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पाठ संवादरूपात असल्याने हे करणे शक्य होईल.

यानंतर भाषिक अंगाने पाठात काय-काय करता येणे शक्य आहे याची नोंद गुरुजींना केली ती पुढीलप्रमाणे :

पाठातून मुलांना संवादाच्या भाषेची वैशिष्ट्ये दाखवून देता येतील. संवादांचे नाट्यीकरण करता येईल.

पाठातून मुलांना संवादाच्या भाषेची वैशिष्ट्ये दाखवून देता येतील. संवादांचे नाट्यीकरण करता येईल.

पाठात अनुस्वार वेगवेगळ्या कारणाने आला हे मुलांच्या लक्षात आणून देता येईल. हे अनुस्वार पुढील प्रकारे आले आहे.

1.शब्दातील अनुस्वार - उदा. किंवा, सांगतो

2.आदरार्थी - रायबांनी

3.अनेकवचनी ‘ए’काराऐवजी - झाडं, फुलं, फळं, रोपं

4.‘ए’कारान्ती क्रियापदाऐवजी - पटलं, व्हायचं

बोलीभाषेत येणारा अनुस्वार

रफार () येणारे शब्द पाठात आले आहेत. उदा. दूर्वा, सर्दी, गर्दी, यामुळे रफाराची उजळणी घेता येईल, गुरुजींनी विचार केला.

‘ऑ’ या स्वरासाठी () ही खूण मुलांना समजून घेता येईल. 

दोन्ही शब्द जोडाक्षरे असणारे दोन अक्षरी शब्द आले आहे. त्यांचा उपयोग श्रृतलेखनासाठी करता येईल.

पाठात आलेल्या विरामचिन्हांचे व संवादातील भाषेचे काय नाते आहे हे उलगडून दाखवता येईल.

गुरुजींनी या पाठाच्या मदतीने मुलांना परिसरात काय-काय करता येईल, कोणते अवांतर काम देता येईल याचेही नियोजन केले. ते पुढे दिले आहे.

(1)सब्जा, दूर्वा, तुळस, गवती चहा, बेल, अडुळसा या वनस्पती गोळा करून त्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे.

(2)पाठात न आलेल्या पण परिसरातील माहितीच्या इतर औषधी वनस्पती गोळा करणे.

(3)काढा तयार करून पिणे.

(4)औषधी वनस्पती माहितीपुस्तिका तयार करणे.

(5)आपापल्या घरी बाग कशी तयार करता येईल याचा विचार करणे.

इतकी सगळी पूर्वतयारी झाल्यावर गुरुजींनी शिकवण्याचे नियोजन केले. साधारणपणे आठवड्याला एक पाठ शिकवला गेला पाहिजे. हे वार्षिक नियोजनाच्या वेळीच गुरुजींच्या लक्षात आले होते. त्यामुळे एका आठवड्याच्या सर्वच्या सर्व म्हणजे सुमारे १० तासिकांइतका वेळ वापरून हा पाठ शिकवावा असे त्यांनी ठरवले यानंतर गुरुजींनी पाठ प्रत्यक्ष कसा शिकवला हे पाहू.

गुरुजींनी या पाठाच्या आशयाच्या अंगाने, भाषिक अंगाने व त्याची अनुभवाशी सांगड कशी घालता येईल या दृष्टीने विचार केला आहे. तुम्हीही असाच कोणताही एक पाठ निवडा. तीन-चार वेळा वाचा व या तिन्ही अंगाने त्यात कोणते मुद्द आले आहेत हे लिहा.

गुरुजींनी वर्गात ‘आपण आजारी पडलो तर औषधे कोठून आणतो?’ असा प्रश्न विचारून चर्चेला सुरुवात केली. औषदाच्या दुकानातून, डॉक्टराकडून आपण औषधे आणतो व घरातही आपल्याकडे औषधे असतात असे मुद्दे पुढे आले. ‘औषधे कशी बनवत असतील?’ अशा प्रश्नाच्या आधारे मुलांना गुरुजींनी तर्क वितर्क करण्याची संधी दिली व काही औषधे आपल्याला झाडापासून मिळतात असे सांगितले. या झाडापासून मिळणार्‍या औषधांची माहिती आपल्या पुस्तकात आहे ती आपण वाचणार आहोत अशी कल्पना गुरुजींनी मुलांना दिली.

‘घरचे डॉक्टर’ या पाठाचे पान उघडून पहिला परिच्छेद तुम्ही वाचा व न येणारे शब्द लिहून काढा असे गुरुजींनी मुलांना सांगितले. या कामातून बर्‍याचशा औषधी वनस्पतींची नावे अनोळखी शब्द म्हणून मुलांनी लिहिली. काही जणांना वैद्य व कंसात लिहिलेला डॉक्टर हा शब्द यांचा परस्पर संबंध कळला नव्हता. त्यांनी वैद्य हाही शब्द अनोळखा शब्दांच्या यादीत घातला. यानंतर गुरुजींनी मुलांना आधीच गोळ करून ठेवलेले सब्जा, तुळस, बेल, आलं इत्यादी वनस्पतींचे नमुने दाखवले व हे लहान कुंडीमध्ये पेरले. वैद्य या शब्दाचा अर्थ सांगितला व परिच्छेद पुन्हा वाचण्यास सांगितले व काय समजले हे तपासण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले.

(1)आपण बागेत नेहमी कोणती झाडे पाहतो ?

(2)आबांची बाग नेहमीसारखीच होती की वेगळी होती ?

(3)त्यांच्या बागेत काय वेगळे होते ?

ही सर्व चर्चा झाल्यार गुरुजींनी, मुलांनी वाचलेला भाग पुन्हा मोठ्याने योग्य स्वराघातांसह वाचून दाखवला व पहिल्या दिवसाचे काम संपले.

हा पाठ शिकवताना गुरुजींनी आधी वाचून न दाखवता मुलांना स्वतः पाठ वाचायला सांगितला आहे. गुरुजींनी असे का असावे ? तुमचे मत लिहा.

नंतरचे दोन दिवस वर वाचलेल्या पद्धतीनेच पाठाचा तुकडा वाचणे, त्यातील अनोळखी शब्दांवर चर्चा, प्रश्नोत्तरे व शेवटी गुरुजींचे प्रकट वाचन असा कार्यक्रम चालू होता. तिसर्‍या दिवशी संपूर्ण पाठ वाचून संपला. दुसर्‍या दिवसाच्या शेवटी गुरुजींनी पाठात न आलेल्या पण मुलांच्या परिसरात सापडणार्‍या इतर औषधी वनस्पती मुलांना गोळा करून आणण्यास सांगितले व तिसर्‍या दिवशी वर्गात त्याचे प्रदर्शन भरवले. प्रदर्शनातील प्रत्येक नमुन्याखाली वनस्पतींची नावे लिहिली होती. चौथ्या दिवशी गुरुजींनी मुलांना प्रथम रफार येणारे पाठातील शब्द हुडकण्यास सांगितले. रफाराची ओळख गुरुजींनी दुसरीच्या सुरवातीस ‘र’च्या खुणांचा खेळ (भाषिक खेळ) शिकवतानाच करून दिली होती. ही त्या भागाची उजळणी होती. (या पुस्तकाची ‘वाचन कौशल्याचा विकास’ या प्रकरणात याबद्दल सविस्तर माहिती आहे.)

आता गुरुजींनी मुलांना डॉक्टर हा शब्द मोठ्या आकारात लिहून दाखवला.  अशी खूण अक्षराच्या वर काढली की तिचा उच्चार अ असा होतो. तर आकारयुक्त अक्षरावर  काढली की त्याचा उच्चार आ असा होतो हे स्पष्ट केले. आता अ आणि आ उच्चार असणारे शब्द शोधा असा अभ्यास गुरुजींनी मुलांना दिला.

बॅट बॉल

बँक ऑफिस

कॅट कॉट

असे शब्द मुले शोधू लागली.

इंग्रजी उच्चारांचे मराठीत लेकन करताना अ आणि आ ह्या खुणा वापरल्या जातात हे तुमच्या लक्षात आले असेल.

पाचव्या तासिकेला एका खेळाने गुरुजींनी पाठाला सुरुवात केली. आज दोन अक्षरी व दोन्ही अक्षरे व दोन्ही अक्षरे जोडाक्षर असणारे शब्दांचे लेखन करायला शिकवायचे गुरुजींनी ठरवले होते. पाठात आलेल्या स्वच्छ शब्दापासून त्यांनी सुरवात केली. स्वस्त, ग्रस्त, व्यस्त असे शब्द ते मुलांना सांगू लागले. मुले पाटीवर शब्द लिहू लागली.

दोन अक्षरी शब्द जे दोन्ही जोडाक्षरे त्यांची यादी करा. असे संग्रह आपल्याला उपयोगी पडतात.

दहा मिनिटात हा खेळ संपला. वर्गातील सर्व मुलांना क्रमिक पुस्तकातील ‘घरचे डॉक्टर’ पाठ काढायला सांगितला. पुस्तके हातात घेऊन उभे राहावे असेही त्यांनी मुलांनी सांगितले. त्यानंतर पाठातील एक – एक वाक्य विरामचिन्हांच्या योग्य स्वराघातासह ते वाचू लागले. गुरुजींच्या मागोमाग मुलेही त्यांचे अनुकरण करीत वाचू लागली. या पाठात पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, अवतरण चिन्ह, जोडशब्दामधील आडवी रेघ, क्रमाने पुढे येणार्‍या शब्दांसाठी ....... अशी खूण अशी अनेक चिन्हे आली आहेत. या चिन्हांचे वाचन कसे करायचे हे त्यांना आज दाखवायचे होते. त्यांना संज्ञा द्यायची होती व प्रत्येक चिन्ह आले असता कसे वाचायचे हेही समजून द्यायचे होते. हा पाठ संवादात्मक पद्धतीने लिहिलेला असल्यामुळे येथे इतकी विरामचिन्हे आली आहेत. त्यांच्या वाचनाचा अभ्यास या पाठात करण्याचे गुरुजींनी नियोजनातच ठरवले होते.

गेला आठवडाभर ‘घरचे डॉक्टर’ या पाठाचा अभ्यास सुरू होता. तिसर्‍या दिवशी भरवलेल्या प्रदर्शनामुळे मुलांचे लक्ष परिसरातील औषधी वनस्पतींकडे गेले होते. त्यानंतरही ते नवनवी वनस्पतींची नावे रोज सांगत होती. आज शनिवार होता, सकाळी चांगली थंडी पडली होती. गुरुजींनी गवती चहा, तळस, आलं, गुळ आणले होते. मुलांच्या मदतीने त्यांनी स्टोव्हवर काढा करायला ठेवला. त्याचा घमघमाट वर्गात पसरला होता. सर्व पानांचा अर्क चांगला उतरल्यावर तो औषधी काढा गुरुजींनी सगळ्या मुलांना कप-कप प्यायला दिला. अशा कृतिपाठाने मुले खूष होतात. नवी चव, औषधी काढा शिकण्याचा आनंद ती अनुभवत होती. शाळा सुटताना गुरुजींनी मुलांना सांगितले. सोमवारी येताना सगळ्यांनी काढ्याची कृती लिहून आणा, असे अनुभवसिद्ध गृहपाठ करायला मुलांना आवडतात असा गुरुजींचा पूर्वानुभव होताच.

‘घरचे डॉक्टर’ पाठाला सुरुवात झाली आणि आता त्याने प्रकल्पाचे रूप घेतले होते. पुढल्या दिवशी गुरुजींनी प्रत्येक मुलाला स्वतंत्र कागद दिला आणि एक एक परिचित औषधी झाडाचे पान दिले. प्रत्येकाने आपल्याला मिळालेले पान कागदावर चिकटवायचे होते व त्या पानाचे वर्णन, त्याचे औषधी गुण लिहायचे होते. काही मुलांनी पानाच्या वर्णनाबरोबरच त्या-त्या झाडाचे वर्णनही केले होते. झाडाचे वर्णन पाने मिळवणार्‍यांना उपयोगी पडले असा त्यांनी कयास केला होता. आपली मुले स्वतः विचार करीत आहेत याने गुरुजी सुखावले होते.

आज पाठाचा आठवा दिवस होता. पाठ सुरू करताना दाखवायला आणलेले आले तेव्हा गुरुजींनी कुंडीत खोंचून ठेवले होते. आज त्यातून लहान रसरशीत पाने वर आली होती. मुले कुंडीजवळ गोळा झाली. आपणही घरी गेल्यावर आले, तुळस, गवती चहा लावू असे ती ठरवत होती. गुरुजींनी बागकामाकडे चर्चा वळवली. ज्यांच्या घरी अंगण नाही त्यांनी कुंडीत, डब्यात रोपे लावा असे त्यांनी सुचवले. पाला-पाचोळ्याने कुंडी भरताना उपयोग करा त्याचे झाडासाठी खत होते हेही त्यांनी आवर्जून सांगितले. आता घरोघरी औषधी झाले लावली जाणार, त्याची निगराणी होणार आणि उपयोगही केला जाणार हे गुरुजींना कळले होते.

नवव्या दिवशी गुरुजींनी मुलांना प्रश्न सांगितले, त्यांची उत्तरे मुलांनी लिहायची होती.

प्रश्न असे होते.

प्रश्न १ - रायबा आणि आबा यांचे नाते काय असेल ?

प्रश्न २ - औषधी झाडांच्या बागेची आवड कोणाला होती ?

प्रश्न 3 - डॉक्टर या शब्दासाठी पाठात आलेला मराठी शब्द कोणता ? झाडांना मुके डॉक्टर का म्हटले आहे ?

प्रश्न ४ - वेगवेगळ्या झाडांचे वेगवेगळे अवयव गुणकारी असतात. कोणत्या झाडाचे कोणते अवयव आपण खातो याचा विचार करून जोड्या लावा.

गुलाब मुळ

ज्येष्ठमध बी

अडुळसा खोड

माईनमूळ पान

मोहरी पाकळी

 

भाषेचे पुस्तक घ्या, त्यातील घरचा डॉक्टर पाठ काढा आणि मी विचारेन त्या प्रश्नांची उत्तरे पुस्तकाच्या मदतीने सांगा असे गुरुजींनी सांगितले.

प्रश्न १ - पान ४८ वरील चित्रातील दोघांपैकी रायबा आणि आबा कोणते असतील ते सांगा. ते तुम्ही कशावरून ठरवले तेही सांगा.

प्रश्न २ - रायबांचे वय किती असेल ? त्यांच्या वयाबाबत आलेले वाक्य तसेच्या तसे वाचा.

प्रश्न 3 - पाठात आलेली तीन प्रश्नार्थक वाक्ये वाचा.

प्रश्न ४ - झाडांचे आपल्याला होणारे उपयोग पाठात शोधा व ते मोठ्याने वाचा.

८.४ कवितेचे अध्यापन – एक नमुना

गद्य पाठाचे अध्यापन कसे करावे याचा एक नमुना आपण सविस्तर पाहिला. आता कविता मुलांना कशी उलगडून दाखवावी याचा एक नमुना आपण पाहणार आहोत. पाठाप्रमाणेच कविता शिकवतानाही तिचा आशय व भाषिक सौंदर्य या दोन्ही अंगांचा विचार करावा लागतो. कवितांमधून वृत्ती विकासाकडे घेऊन जाण्याचे कामही मोठ्या प्रमाणावर घडते. स्वातंत्र्य आंदोलनापासून ते नंतरच्या प्रत्येक चळवळीची स्वतःची गाणी आहे. म्हणजेच स्फूर्ती मिळणे हेही कवितांमधून साध्य होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कविता ही एक कलाकृती असते. तिचा आस्वाद घेता येणे हे माणसाच्या समृद्धपणाचे एक लक्षण आहे. पाठ्यपुस्तकातील कविता उलगडायची कशी हे मुलांना शिकवणे कवितेच्या अध्यापनात मध्यवर्ती असायला हवे. एका शाळेतील शिक्षिकेने आपल्या चौथीच्या पाठ्यपुस्तकातील बहिणाबाईंची कविता मुलांसमोर कशी उलगडून दाखवली ते आता आपण पाहू.

शिक्षिकेने प्रथम स्वतःच कविता तीन-चार वेळा वाचली. तिला चाल लावली आणि म्हणून बघितली. नंतर मुलांना ‘आपण नवीन गाणी शिकणार आहोत. मी गाते, तुम्हीही माझ्यासोबत गा.’ असे सांगतिले. सुंदर चालीवर हाताने ठेका धरून शिक्षिकेने मुलांना कवितेची एकेक ओळ सांगितली. कविता सांगताना चेहर्‍यावरील हावभावातून, शरीराच्या हालचालीतून कवितेचा भाव प्रकट होत असतो हे बाईंना पक्के माहिती होते. त्याचा योग्य वापर बाईंनी कविता गाताना केला.

एक आठवडाभर रोज ५ मिनिटे शिक्षिका या वर्गात “धरत्रिले दंडवत” ही कविता मुलांसोबत गात होत्या. आठवडाभरात ती कविता बहुतेकांना पाठ झाली. या काळात शिक्षिकेने कवितेचा अर्थ जाणूनबुजून उलगडून दाखविलेला नाही. कवितेची नादमयता, गेयता मुलांनी आठवडाभर अनुभवली. अर्थामध्ये शिरण्यापूर्वी कविता अशी अनुभवणे हे खूपच महत्त्वाचे आहे. प्राथमिक स्तरावरील क्रमिक पुस्तकातील बहुतेक कविता गेय आहेत त्यामुळे त्या वारंवार वर्गात म्हणणे हे कविता समजण्याची पूर्वतयारी म्हणून करून घ्यायला हवं.

आठवडाभर रोज ५ मिनिटे कविता गायल्यानंतर एके दिवशी शिक्षिकेने मुलांना विचारले की कविता कोणी लिहिली आहे ते पुस्तकात बघून सांगा. बर्‍याच मुलांना आधीच ते पाहिले होते. त्यांनी लगेच उत्तर दिले. कविता लिहिणारी जर स्त्री असलेत तर तिला कवयित्री म्हणायचे हेही शिक्षिकेने मुलांना सांगितले. नंतर शिक्षिकेने महाराष्ट्राचा नकाशा समोर आणून त्यात बहिणाबाई खानदेशातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्या भागातल्या तेही दाखवले. या शिक्षिकेची शाळा कोकणात होती त्यामुळे खानदेशातल्या मातीबाबत माहिती दिल्याशिवाय ‘काया काया शेतामंदी’ याचा अर्थ मुलांना समजणे शक्य नव्हते. बहिणाबाईंच्या संदर्भात शिक्षिकेने काही माहिता गोळा केली होती. त्यांची गाणी लोकांपुढे कशी आली, याची गोष्ट शिक्षकेने मुलांना सांगितली. इतकी छान कविता लिहिणार्‍या बहिणाबाईंना धड लिहिताही येत नव्हते व त्या शाळेतच गेल्या नव्हत्या हे ऐकून मुलांना फारच आश्चर्य वाटले. अशा प्रकारे शिक्षिकेने एक पूर्ण तासिका बहिणाबाई, खानदेश, वाडवडिलांपासून चालत आलेली शेती, शेतकर्‍यांचे जमिनीवर अवलंबून असणे या सगळ्यांविषयी मुलांशी चर्चा केली. बहिणाबाई जी भाषा बोलत त्याच भाषेत त्यांच्या कविता आहेत ही बाबही शिक्षिकेने मुलांच्या लक्षात आणून दिली.

दुसर्‍या दिवशी एकेक कडवे घेऊन त्याबाबत मुलांना विचार करायला लावला. ‘काया काया शेतात घाम जिरवायचा म्हणजे काय ?’ ‘कायातून हिरवं उगवत’ म्हणजे काय होत असेल अशा प्रश्नांच्या आधारे त्यांनी मुलांना बोलते केले. शेतकर्‍यांचे काबाडकष्ट व त्याच्यामुळे मिळणारे पीक या सगळ्यांशी आपला काय संबंध आहे हेही मुलांना सांगितले. प्रत्येक कडव्यावर असा विचार केल्यावर मुलांनी तालासुरात कविता म्हटली आणि तो तास तिथेच संपला. तिसर्‍या दिवशी शिक्षिकेने मुलांना कवितेतले वेगळे वाटणारे शब्द लिहायला सांगितले. मुलांनी एक यादी केली ती पुढीलप्रमाणे :

(1)काया (३) पिवयं (५) सर्वे (७) कपायी

(2)हिर्वय (४) तीले   (६) जोडीसन (८) टिया

आता बाईंनी मुलांनी केलेल्या यादीतील काया, हिर्वय, पिवयं, कपायी, टिया हे शब्द वेगळे लिहिले व बहिणाबाईंच्या भाषेत ‘ळ’ ऐवजी ‘या’ म्हटले जाते ही गंमत मुलांच्या लक्षात आणून दिली. मग त्यांनी विचारले. ‘झुळूझुळू पाणी पळे’ ही ओळ बहिणाबाईंच्या भाषेत कशी म्हणावी लागेल ? मुलांना खूप गंमत वाटली. मग शिक्षिकेने मुलांना ‘जोडीसन’ हा शब्द फळ्यावर लिहून दाखवला. बहिणाबाई जोडूनला जोडीसन म्हणतात मग त्यांच्या भाषेत करून, घेऊन हे शब्द कसे म्हणता येतील हेही मुलांच्या लक्षात आणून नंतर तीले, मले, तुले या सर्वनामांच्या रूपांबाबत माहिती दिल व या प्रत्येक वेगळ्या शब्दासाठी प्रमाण मराठीतील शब्द मुलांना लिहिण्यास सांगितले. ‘आपण पुस्तकात जी मराठी वाचतो तीच सगळीकडे बोलली जात नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी बोली असते, आपण कोकणात मला तुला ऐवजी तुका माका म्हणतो तशीच ही बहिणाबाईंची बोली आहे’ हा संबंध बाईंनी जाणीवपूर्वक घातला. सुरुवातीला काया, टिया हे शब्द वाचून हसणारी मुले आता गंभीरपणे या प्रादेशिक विविधतेचा विचार करून लागली.

यानंतर शिक्षिकेने मुलांना मन वढाय, वढाय, अरे संसार संसार अशा बहिणाबाईंच्या इतर कविता म्हणायला शिकवले. मुलांनी त्या कवितांचे तक्ते केले व वर्गात लावले. कविता म्हणताना आपल्याला काय डोळ्यासमोर येत याची चित्रे काढली. अशा प्रकारे कविता शिकवून पूर्ण झाली.

बाईंना ही कविता शिकवण्यासाठी काय-काय पूर्वतयारी करावी लागली असेल? ते लिहा.

८.५ समारोप

आपण पाहिले की क्रमिक पुस्तक हे एक महत्त्वाचे साधन आहे पण त्याचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी शिक्षकाला पूर्वतयारी करावी लागते. पाठ शिकवताना पाठाच्या आशयाचे अंग, भाषिक अंग व पाठातून पाठाबाहेर कसे पडावे याचा विचार करावा लागते. कविता ही कलाकृती असते व तिचा रसास्वाद घ्यायला मुलांना शिकवायला हवे. हे प्रकरण वाचल्यावर तुम्हांला एक नवी दिशा मिळेल अशी खात्री वाटते.