Skip directly to content

कृष्णमूर्ती - शिक्षणाविषयी

प्रस्तावना

नवी संस्कृती घडवण्यासाठी आणि मानवी मनाचे आमूल परिवर्तन घडवण्यासाठी जी देवाणघेवाण, जी प्रक्रिया घडावी लागते, त्यात कृष्णमूर्ती शिक्षणाचे स्थान फार महत्त्वाचे मानतात.

निरनिराळी कौशल्ये आत्मसात करताना, विविध शाखांमधे शिकताना, जर स्वतःचा विचार, स्वतःच्या भावना आणि स्वतःची कृती यांबद्दलचे भान येण्यासाठीची ताकद मुलाला दिली गेली, तर असे परिवर्तन घडू शकते. स्वतःकडे डोळसपणे पाहणारी, स्वतःवर लक्ष ठेवणारी मुले त्यातून घडतात. त्यांचे माणसांशी, निसर्गाशी, माणसाने तयार केलेल्या साधनांशी योग्य असे नाते निर्माण होते.

भारतात आणि जगात इतरत्रही, सध्या अनेक पातळ्यांवर प्रचलित शिक्षणपद्धतीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. माणूस आणि गुंतागुंतीचा असा सध्याचा समाज यांच्यात सुसंबद्धता निर्माण करण्यात शिक्षण पूर्णपणे अपयशी ठरले आहे असे दिसून आले आहे.

पर्यावरणीय प्रश्न आणि वाढती गरिबी, भुकेचा प्रश्न आणि हिंसा या वास्तवाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत, शिक्षणाकडे पूर्णपणे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कृष्णमूर्ती केवळ शिक्षणाबद्दल बोलत नाहीत, तर मानवी मन आणि जीवन यांच्या मुळांपर्यंत पोचतात. त्यांचा हा दृष्टिकोन सांस्कृतिक सीमांच्या पलीकडे जाऊन, नवीन समाजनिर्मितीला पूरक असा मूल्यांचा विचार आपल्याला देतो.ही कृष्णमूर्तींनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी केलेली भाषणे असल्यामुळे, भाषाशैली संवादाची आहे.

शिक्षणाविषयी :

केवळ पुस्तकातून शिकणे, माहितीचे तपशील पाठ करणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर पुस्तकात काय म्हटले आहे याकडे कसे बघायचे, त्याचा अर्थ कसा लावायचा, पुस्तकात म्हटलेले चूक आहे की बरोबर – हे शिकणे म्हणजे खरे शिक्षण. फक्त परीक्षा पास होणे, पदवी मिळवणे, नोकरी मिळणे आणि लग्न करून स्थिरावणे एवढ्यासाठीच शिकायचे नसते. पक्ष्याचा आवाज ऐकायचा, आकाशाकडे पाहायचे, झाडाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यांत साठवायचे, टेकडीचा मनोहारी आकार पाहायचा...या सगळ्याशी एक नाते जोडायचे... यासाठीही शिकायचे असते. आपण जसजसे मोठे होत जातो, तसतसे या संवेदनशीलतेला पारखे होत जातो, कारण विविध चिंता आपल्याला घेरतात. जास्त पैसा मिळवायचा असतो, चांगले वाहन खरेदी करायचे असते, मुले हवी असतात किंवा नको असतात.... हव्यास, असूया, हेवा अतिआकांक्षा यांच्यामुळे या पृथ्वीच्या आणि सृष्टीच्या सौंदर्याकडे बघण्याची, ते आस्वादण्याची आपली जाणीव बोथट होऊन जाते. जगात काय चालू आहे हे तुम्ही वाचत असाल. युद्धे, देशादेशांमधली दुही, देशांतर्गत बंडाळी, गरिबी, क्रौर्य आणि ओंगळपणा.... हे सगळीकडे दिसते. आपले जोपर्यंत ठीक चालले आहे, तोपर्यंत दुसर्‍याची फिकीरही माणूस करत नाही ! आणि या सगळ्याशी जुळवून घेण्याचे शिक्षण आपण घेतो, हे बरोबर आहे का?  मनापासून असो वा मनाविरुद्ध, चक्रात स्वतःला बसवण्यासाठी शिकायचे हे योग्य आहे का ? या सगळ्याशी जुळवून घेत जगणे हा सर्वात सोपा मार्ग आहे, पण तसे न करता समाजात परिवर्तन घडवून आणणे हा खरा योग्य मार्ग आहे. तुम्ही आणि मी म्हणजेच समाज; मग आपणच बदलायला हवे. त्यासाठी आपण काय करणार आहोत ?

ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांच्याविषयी :

ऐतिहासिक, जीवशास्त्रीय, भाषिक, गणिती, वैज्ञानिक, भौगोलिक ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही शाळेत येता. या सगळ्यांशिवाय समूहाचे म्हणून एक ज्ञान असते, आपल्या आधीच्या पिढ्या, पूर्वज यांच्याकडचे ज्ञान त्यांनी सर्वांनी जे अनुभव घेतले, त्यांच्या बाबतीत जे जे घडले, त्या सगळ्याचे मिळून ज्ञान बनले. याशिवाय आपले व्यक्तिगत असेही ज्ञान असते. आपल्या स्वतःच्या प्रतिक्रिया, आपले कल, आपल्या वृत्ती यांच्यातून आकाराला येत गेलेले ज्ञान अशा तर्‍हेने ज्ञानाचे तीन मुख्य प्रकार असे – वैज्ञानिक, सामूहिक आणि व्यक्तिगत.

ज्ञान म्हणजे काय ?  ज्ञानाचे बुद्धीशी नाते असते का ? हे समजून घेऊ या. बुद्धी ज्ञानाचा वापर करते. स्पष्टपणे, वस्तुनिष्ठपणे, शहाणपणाने, सुदृढतेने विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. व्यक्तिगत कल, मत, पूर्वग्रह, भावना यांचा अभाव असलेली अवस्था म्हणजे बुद्धिमत्ता. थेट समजून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता हा मनाचा गुणधर्म आहे. स्वंतत्रपणे, तटस्थपणे, स्पष्टपणे विचार करण्याची ताकद त्यात असते.

बुद्धिमत्तेची जोपासना करता येते का ? शाळेत मुलांना ज्ञान देतादेताच बुद्धिमत्तेची जोपासना केली जाते का ? हा मुद्दा महत्त्वाचा आहे, समजा, तुमच्याकडे गणिताचे वा इंजिनीअरिंगचे उत्तम ज्ञान आहे. तुम्ही त्यातली पदवी घेतली आहे, तुम्ही पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला आहात. पण त्याच वेळी तुमची संवदेनाशीलता, सावधपणा जोपासला गेला आहे का ? तुम्ही तटस्थपणे, स्पष्टपणे, उत्तम समजेसह, बुद्धिमत्ता वापरून विचार करता का? ज्ञान आणि बुद्धिमत्ता यांचा समतोल तुम्ही साधता का ? त्या दोन्हींचा उत्तम मेळ घातला जातो का ?

आधीची मते, पूर्वग्रह असतील तर आपण स्वच्छ विचार करू शकत नाही. निसर्गात, समाजात अवतीभवती घडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींबाबत, आपल्या आत घडणार्‍या गोष्टींबाबतही जर आपण संवदेनशील नसू, त्या जर आपल्याला जाणवत नसतील तर आपण निःसंदिग्धपणे विचार करू शकत नाही. बुद्धिमत्ता हे अध्याहृत धरते, की लहानसहान, अगदी तरल बाबीही तुम्हाला जाणवतात.

मग शाळांमध्ये आपली मुले काय करतात ? फक्त पुस्तकातले ज्ञान मिळवतात की त्यांच्या बुद्धिमत्तेची जोपासना होते ? जर आपल्याकडे बुद्धिमत्ता नसेल, संवेदनशीलतेचा अभाव असेल तर निव्वळ ज्ञान फार धोकादायक बनू शकते, संहारक बनू शकते. जगात तेच तर घडताना दिसते ! प्रश्न विचारणारी, शोध घेणारी बुद्धिमत्ता आपल्याकडे आहे का ? सृष्टिसौंदर्य भावणारी, ओंगळेपणा ओळखणारी, आपल्या आतल्या घडामोडींबाबतची जाणीव फुलवणारी, विचारांची तरलता जपणारी अशी बुद्धिमत्ता जोपासली जावी यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी काय करताहेत ? काही करताहेत का ? जर करत नसतील तर शिक्षणाचा काय उपयोग ? शिक्षकाची भूमिका कोणती ? माहिती देण्याची की विद्यार्थ्यांमधली बुद्धिमत्ता जोपासण्याची ? 

मुलांना प्रश्न विचारायला शिक्षकाने प्रोत्साहन द्यायला हवे. पुस्तकी ज्ञानावरचे प्रश्न नव्हेत तर विविध बाबींवरचे प्रश्न. बघायचे कसे ? टेकड्या, झाडे यांच्याकडे कसे बघायचे ? ओढ्याची वाट कशी शोधायची ? निसर्गातले सौंदर्य कसे आस्वादायचे ? शाळेजवळचे शेतकरी, गावकरी यांच्याकडे कसे बघायचे ? अशा गोष्टी समजून घेण्यासाठी शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी तिथे जायला हवे. तरच संवेदनशीलता वाढीस लागले. संवेदनशीलता वाढली, की बेफिकिरी कमी होते. आपण कसे राहतो, कसे वागतो, काय करतो यांकडे सजगपणे, संवदेनशीलतेने पाहायला शिकायला हवे. डोळस नजरेने बघायचे, चर्चा करायची, निर्भीडपणे प्रश्न विचारायचे, शोध घ्यायचा म्हणजे “शिकायचे.” या सगळ्यातून मुलांची बुद्धिमत्ता जोपासल्यावर, या जगात अर्धवट झोपल्यासारखे न जगता, सुदृढपणे शहाणपणा वापरून कसे जगायचे हे जाणून घेण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना मदत करायला हवी, जीवनातले सौंदर्य, कुरूपता, आनंद, भीती, वेदना समजून घ्यायला मदत करायला हवी. जीवनाचा पट उलगडून पाहायला, त्याची व्याप्ती समजून घ्यायला शिक्षकाने मदत करायला हवी. हे खरे शिक्षकाचे काम. नुसता माहितीचा, ज्ञानाचा भडिमार करणे हे त्याचे काम नव्हे. शिक्षकाने आपले काम उत्तम प्रकारे केले, तरच विद्यार्थ्यांमधून अविचारी, संहारक, दुष्ट माणसे घडायचे थांबेल, आणि बुद्धिमत्ता वापरणारी, जगण्याची चांगली क्षमता असलेली फार चांगली माणसे घडतील.

केवळ ज्ञान देणे हे शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असू शकत नाही. समाजात इंजिनीअर्सची जास्त गरज आहे हे कळताच शिक्षण, इंजिनीअर्सची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्याकडे वळते. अशा प्रकारे, केवळ त्या त्या वेळची गरज तत्काळ भागवणारी उत्तरे शोधण्यापलीकडे नेणारी दूरदृष्टी शिक्षणामुळे मुलांना मिळायला हवी. जे व्यापक आहे, सखोल आहे, त्याची समज मुलांमध्ये विकसित व्हायला हवी. निर्माण झालेली गरज त्या त्या वेळेपुरती तत्काळ भागवण्यामुळे व्यापक दृष्टिकोन हरवून जातो, आपल्या भावना, शरीर, मन पोकळ आणि उथळ बनत जातात. हे शिक्षकाला समजले तर फक्त तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यापाशी शिक्षक थांबणारच नाहीत, विद्यार्थ्यांची जीवनाविषयची समज वाढावी यासाठी प्रयत्न करत राहतील.

ज्ञान म्हणजे जीवनाचे सारसर्वस्व नव्हे, तर संवेदनशीलतेने सृष्टी, समाज आणि आपण स्वतः यांच्याकडे बघायला शिकणे महत्त्वाचे. प्रेम, सहानुभूती, दया म्हणजे काय हे समजणेही महत्त्वाचे आहे.

हे प्रत्यक्षात आणायचे असेल तर मुळात ही जाणीव असणार्‍या शिक्षकांचा गट असायला हवा. त्यांची दृष्टी, समज, उत्साह यांतून केवळ ज्ञानदानापाशी न थांबता त्यापलीकडे कसे जायचे या दिशेने काही ना काही घडू शकेल. आता, हे सगळे विचार तुम्ही समजून घेतले. आता पुढे काय करणार हे खरे महत्त्वाचे !