Skip directly to content

कागदाचे कपडे

आज दुपारी मनूच्या शिबिरात गंमतच झाली. ताईनं प्रत्येक गटाला थोडी पेपरची रद्दी दिली. तिनं सांगितलं, "या कागदांपासून तुम्ही छान ड्रेस तयार करायचा आणि कोणाला तरी तो घालून छान नटवायचं". झालं ! सगळे कामाला लागले.
 
मनूच्या जास्वंद गटात मनूच सगळ्यात लहान होती. सगळ्यांनी ठरवलं, आपण मनूलाच नटवू या. अमितदादा कात्री, स्टेपलर, डिंक असं सामान घेऊन आला आणि काम सुरू झालं. 
 
वाजिदनं भराभर मनूची मापं घेतली. कागदावर एक छानसा फ्रॉक बेतला आणि कात्रीनं कापला. ज्युलियानं कागदाचीच सुंदर पर्स आणि कॅप बनवली. एका बाजूला बसून वनशा कागदाचे दागिने बनवत होता. हातात घालायला बांगड्या, गळ्यातलं, अंगठी असं खूप काही त्यानं तयार केलं. त्यानं कागदाचं एक सुंदर फूलही तयार केलं. 
 
मग वाजिदनं कापलेला फ्रॉक मनूच्या अंगाभोवती गुंडाळून स्टेपलरनं जोडून टाकला. हातात, गळ्यात वनशानं बनवलेले दागिने घातले. डोक्यावर ज्युलियानं बनवलेली टोपी घातली. मनू अगदी एखाद्या बाहुलीसारखी दिसू लागली. मग एका हातात पर्स आणि एका हातात फूल घेऊन मनू सगळ्यांसमोर आली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मनूनं सगळ्यांना नमस्ते केलं. 
 
कागदाचा ड्रेस करण्यासाठी अमितदादाने कोणतं सामान आणलं? 
पर्स आणि कॅप या दोन शब्दांसाठी कोणते मराठी शब्द वापरलेत?
वाजिदनं फ्रॉक कापण्याचं काम का केलं असेल?
वनशाला कागदाचे दागिने बनवायला का जमले असतील?